
Mumbai Crime News: मुंबईत राहणाऱ्या एका 26 वर्षीय टेलिव्हिजन अभिनेत्रीला सायबर फसवणुकीचा फटका बसला आहे. दिल्ली पोलिसाचा अधिकारी असल्याचे भासवून एका ठगाने तिला डिजिटल अटक करून जवळपास सात तास ऑनलाइन ठेवले आणि 6.5 लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी अभिनेत्रीने ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पीडित अभिनेत्रीने अनेक बंगाली टेलिव्हिजन मालिका आणि काही हिंदी शोमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी ती नुकतीच मुंबईत राहायला आली होती आणि सध्या ती जोगेश्वरी (पश्चिम) येथे राहते. सोमवारी तिला एका व्यक्तीचा फोन आला. ज्याने स्वतःला मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने दावा केला की, तिचा नंबर बेकायदेशीर बँकिंग हालचालींशी जोडलेला आहे आणि लवकरच तो निष्क्रिय केला जाईल.
दिल्ली सायबर विभागाचा अधिकारी म्हणून परिचय
थोड्याच वेळात तिला एका पोलिसाच्या वेशात असलेल्या व्यक्तीकडून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला. ज्याने स्वतःची ओळख दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाचा अधिकारी अशी करून दिली. व्हिडिओ कॉल दरम्यान, त्या व्यक्तीने तिला एकट्याने बसून आधार कार्ड दाखवण्यास आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस म्हणून कामात सहकार्य करण्यास सांगितले.
(नक्की वाचा- Jalna ACB Raid: 'लोका सांगे ब्रम्हज्ञान..', लाचखोर आयुक्तांचा धक्कादायक प्रताप, 2 दिवसांपूर्वी काय घडलेलं?)
फसवणूक करणाऱ्याने दावा केला की, ती अनेक आर्थिक फसवणुकीत सामील आहे आणि जर तिने दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही, तर तिचा पासपोर्ट आणि बँक खाती गोठवली जातील. त्याने तिला बनावट सर्वोच्च न्यायालयाची कागदपत्रे आणि कायदेशीर नोटिसा देखील पाठवल्या, ज्यामुळे तिची भीती वाढली.
दबावाखाली आल्याने अभिनेत्रीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी टेम्पररी व्हेरिफिकेशनसाठी बँक खात्यात 6.5 लाख रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. फसवणूक करणाऱ्याने तिला आश्वासन दिले की, एकदा तिची ओळख स्पष्ट झाल्यावर पैसे परत केले जातील. त्यावर विश्वास ठेवून, तिने सांगितल्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर केले.
पीडित ओशिवरा पोलीस ठाण्यात
व्हिडिओ कॉल संपल्यानंतर, अभिनेत्रीला संशय आला आणि तिने Truecaller ॲपवर कॉलरचा नंबर तपासला. त्यानंतर तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तिने तात्काळ ओशिवरा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world