जाहिरात

गणेशोत्सवासाठी कुख्यात डॉन वेश बदलून हजेरी लावायचा? पोलिसांसह कोणाच्याच नजरेला नाही पडला

माटुंग्यातील वरदराजन मुदलियारचा गणेशोत्सव हा त्याकाळी बराच प्रसिद्ध होता. तो मुंबई सोडून तामिळनाडूला पळून गेल्यानंतरही अनेक वर्षे इथला गणेशोत्सव त्याच्या नावाने प्रसिद्ध होता.

गणेशोत्सवासाठी कुख्यात डॉन वेश बदलून हजेरी लावायचा? पोलिसांसह कोणाच्याच नजरेला नाही पडला
मुंबई:

जीतेंद्र दीक्षित, मुंबई

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरूवात होताच एकामागोमाग एक सार्वजनिक उत्सवांना सुरूवात होते. मुंबई हे कधीही न झोपणारं शहर म्हणून प्रसिद्ध असून, हे उत्सव धावपळीच्या आयुष्यात मुंबईकरांना काही आनंदाचे क्षण देणारे ठरतात. यामुळे हे शहर उत्सवांवर मनापासून प्रेम करणारे शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथे साजरा होणारा कोणताही सण असो, दहीहंडी असो, गणेशोत्सव असो किंवा दांडिया अथवा नवरात्रोत्सव; सगळे सण भव्य प्रमाणात आणि दणक्यात साजरे केले जातात. या सणांमध्ये सर्वसामान्य मुंबईकर जसे भाग घेतात तसेच अंडरवर्ल्ड माफिया देखील भाग घ्यायचे.

नक्की वाचा: पंजवक्त्र महादेव मंदिराला ब्यास नदीच्या पाण्याचा विळखा, 300 वर्षांच्या इतिहासावर संकट

सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणेशोत्सवाभोवतीचे गूढ  

गणेशोत्सव हा मुंबईतील निर्विवादपणे सगळ्यात मोठा उत्सव आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या काळात संपूर्ण मुंबापुरी नटलेली, सजलेली असते. याच उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे विविध देखावे तयार करतात. ते पाहण्यासाठी आणि गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकं मुंबईत येत असतात. काही मंडळे अशी आहेत जी देखावे तयार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. इथली भव्यता ही दरवर्षी चर्चेचा विषय असतो. या मंडळांपैकी एक मंडळ हे दरवर्षी चर्चेत असतं. या मंडळाचं नाव आहे सहयाद्री क्रीडा मंडळ. चेंबूरच्या या मंडळाची दुसरी एक ओळख आहे. इथला गणपती छोटा राजनचा गणपती म्हणून अनेकांना परिचित आहे. याचं कारण म्हणजे भारतातून पळ काढण्यापूर्वी म्हणजेच 1988 सालापूर्वी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन ज्या भागात राहायचा त्याच भागात हे गणेशोत्सव मंडळ आहे. छोटा राजन चेंबूरच्या सहकार सिनेमाबाहेर तिकिटे ब्लॅकमध्ये विकायचा आणि याच भागातून तो कुख्यात गुंड म्हणून उदयास आला.  

छोटा राजनबद्दलची अफवा

1994 पर्यंत दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन यांचे संबंध अगदी घट्ट होते, 1986 साली दाऊद मुंबईतून पळाला आणि तो दुबईत जाऊन लपला होता. त्याच्या पाठोपाठ छोटा राजनही दुबईला पळाला होता. छोटा राजन मुंबईतून पळाला खरा मात्र त्याचे नाव चेंबूरच्या सह्याद्री क्रीडा मंडळाशी कायमचं जोडलं गेलं होतं. राजन दुबईला पळून गेल्यानंतरही अशी अफवा होती की, गणेशोत्सवाच्या काळात छोटा राजन हा वेश बदलून मुंबईत दर्शनासाठी हमखास येतो. या अफवेमुळे या मंडळावर साध्या वेशातील पोलीस डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असायचे. छोटा राजन दिसला तर त्याला तिथेच पकडायचा यासाठी ते फिल्डींग लावून असायचे. छोटा राजनची बायको सुजाता आणि त्यांची मुले अजूनही सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणपती ज्या मैदानात बसतो, त्याच्या शेजारील इमारतीमध्ये राहतात.    

नक्की वाचा: दुकानातून मूर्ती खरेदी करताना आधीच पाहून घ्या 'या' गोष्टी, अन्यथा पश्चाताप होईल!

राजनचा गणपती तर डॅडीची देवी

गणपती उत्सवासोबत छोटा राजनचे नाव जोडले गेले , त्याच पद्धतीने भायखळ्यातील एका देवीच्या उत्सवाशी अरूण गवळी याचे नाव जोडले गेले होते. एकेकाळी मिल कामगार असलेला अरुण गवळी हा अंडरवर्ल्ड डॉन बनला, डॉन बनल्यानंतर तो राहात असलेल्या दगडी चाळीतील नवरात्रोत्सव अधिकच प्रकाशझोतात आला. डॅडीची देवी अशी या देवीची ओळख निर्माण झाली होती. गवळी तुरुंगात असो अथवा तुरुंगाबाहेर, दगडी चाळीतील नवरात्रोत्सव कायम चर्चेत असतो. इथल्या देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या ही कधीही कमी झाल्याचे पाहायला मिळालेले नाही.  एका शिवसैनिकाच्या हत्ये प्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो सध्या तुरुंगात आहे. त्याच्या पश्चात त्याची मुलगी गीता गवळी हा या उत्सव आयोजित करत असतात. अरुण गवळी यांच्यापाठोपाठ त्यांची मुलगी गीता गवळी ही राजकारणात उतरली होती आणि त्या तीनवेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत.  

अश्विन नाईकचा नवरात्रोत्सव

अरुण गवळीच्या दगडी चाळीपासून अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर गवळीचा कट्टर वैरी आणि अंडरवर्ल्ड डॉन अश्विन नाईक याचं घर आहे. एक काळ असा होता जेव्हा गवळी आणि नाईक गँग एकमेकांना संपवायला उठल्या होत्या. अरुण गवळीच्या गँगमधील काहींनी अश्विन नाईक याच्यावर गोळीबार केला होता. नाईकच्या डोक्यात दोन गोळ्या घुसल्या होत्या. या जीवघेण्या हल्ल्यातून अश्विन नाईक बचावला खरा मात्र या हल्ल्यानंतर तो अपंग झाला आणि व्हीलचेअरला खिळून बसला. अरुण गवळी याच्याप्रमाणेच अश्विन नाईक हा देखील देवीचा भक्त आहे. अश्विन नाईकतर्फे चिंचपोकळी भागामध्ये मोठ्या धूमधडाक्यात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. अश्विन नाईक हा सगळ्या आरोपांतून मुक्त झाला असून सध्या तो रियल इस्टेट व्यवसायात शिरला आहे.  

नक्की वाचा: गणपती बाप्पाच्या आगमनाला पावसाचा बँडबाजा, मुंबई-ठाण्यासह 20 ठिकाणी Yellow Alert

माटुंग्यातील वरदराजन मुदलियारचा गणेशोत्सव हा त्याकाळी बराच प्रसिद्ध होता. तो मुंबई सोडून तामिळनाडूला पळून गेल्यानंतरही अनेक वर्षे इथला गणेशोत्सव त्याच्या नावाने प्रसिद्ध होता. याचप्रमाणे, हाजी मस्तानची रमजान ईद प्रसिद्ध होती. भेंडी बाजारातील 'नूर मोहम्मदी' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये, जे 'नल्ली निहारी' साठी प्रसिद्ध आहे, तिथे मस्तान ईदची पार्टी ठेवायचा आणि त्यात करीम लाला, युसुफ पटेल आणि वरदराजन मुदलियार यांसारख्या शहरातील इतर मोठ्या डॉनना तो आमंत्रित करायचा. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com