जाहिरात

Nagpur News: नागपुरात 'अण्णा गँग'ची दहशत! एकाच दिवसातील 3 मोठ्या घटनांनी नागपूरकर चिंतेत

Nagpur News: नागपुरात परप्रांतीय कुख्यात 'अण्णा गँग'ने धुमाकूळ घातला असून, अवघ्या एका दिवसात 3 मोठ्या चोरीच्या घटना घडवून आणल्या आहेत. शहरातील बजाजनगर, अंबाझरी आणि सीताबर्डी भागात या चोऱ्या झाल्या.

Nagpur News: नागपुरात 'अण्णा गँग'ची दहशत! एकाच दिवसातील 3 मोठ्या घटनांनी नागपूरकर चिंतेत

नागपूर शहरात पुन्हा एकदा परप्रांतीय गुन्हेगारांच्या टोळीने धुमाकूळ घातल्याने नागपूर पोलिसांची झोप उडाली आहे. शहरातील वेगवेगळ्या तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच दिवशी अत्यंत चालाकीने 3 मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. या तिन्ही घटनांमधील मुख्य दुवा म्हणजे, प्रत्येक ठिकाणी तेच 4 ते 5 संशयित आरोपी गुन्हे करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. प्राथमिक तपासात ही कुख्यात 'अण्णा गँग' असण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, या टोळीने उपराजधानीत मोठी दहशत निर्माण केली आहे.

एकाच दिवसात 3 वेगवेगळ्या भागात चोऱ्या

1. हॉस्पिटल पार्किंगमधून 1.50 लाख लंपास 

पहिली घटना बजाजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मिडास हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये घडली. आपल्या नातेवाईकावर उपचार करण्यासाठी आलेले एक 40 वर्षीय राईस मिल संचालक हॉस्पिटलमध्ये गेले असताना, चोरट्यांनी त्यांच्या कारची डिक्की अत्यंत कौशल्याने उघडून आतील 1.50 लाख रुपयांची रोकड चोरून नेली.

2. नजर चुकवून महिला चालकाला लुटले

दुसरी घटना अंबाझरी परिसरात घडली. येथे एक 46 वर्षीय महिला आपल्या कारमध्ये बसलेली असताना, एका तरुणाने कारपाशी येऊन 'खाली पैसे पडले आहेत' असा बहाणा केला. महिला पैसे उचलण्यासाठी खाली उतरताच, मागून आलेल्या त्याच्या दुसऱ्या साथीदाराने कारच्या सीटवर ठेवलेली लाखोंचे दागिने आणि रोकड असलेली बॅग लंपास केली.

3. कारची काच फोडून आयपॅड चोरी

तिसरी घटना सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. येथे एका 44 वर्षीय कंपनी मॅनेजरची कार पार्किंगमध्ये उभी होती. भामट्यांनी कारची काच फोडून आत ठेवलेला महागडा आयपॅड (iPad) आणि इतर साहित्य चोरून पळ काढला.

रेल्वे स्थानकावरील CCTV ने गुंता सोडवला

"ही परप्रांतीय टोळी अचानक शहरात आली कुठून?" या प्रश्नाचा शोध घेताना पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचा पुरावा लागला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरील चौथ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता, हे संशयित आरोपी ग्वाल्हेर-बेंगळुरू एक्सप्रेसने नागपुरात दाखल झाल्याचे समोर आले आहे. रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडतानाचे त्यांचे चेहरे हुबेहूब चोरीच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजशी जुळत आहेत.

पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

एकाच दिवसात लागोपाठ तीन घटना घडल्यामुळे नागपूर पोलिसांच्या गस्त यंत्रणेवर आणि पाळत ठेवण्याच्या पद्धतीवर नागरिकांमधून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागपूर पोलीस आयुक्तालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अण्णा गँगचा बिमोड करण्यासाठी विशेष पथके गठीत केली आहेत. आरोपींच्या संभाव्य ठिकाणांवर आणि लॉजवर पोलिसांकडून रात्रीपासूनच छापे टाकले जात आहेत.

आता हे हायटेक चोरटे पोलिसांच्या हाती लागतात, शहरात पुन्हा नवीन गुन्हे करतात की पोलिसांचा वाढता दबाव पाहून आल्या पावली पळून जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बजाजनगर, अंबाझरी आणि सीताबर्डी पोलीस संयुक्तपणे करत आहेत.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com