राहुल वाघ, प्रतिनिधी
Nashik News: नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघड झाली आहे. येथील मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिला आहे. या संवेदनशील आणि गंभीर घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला असून, आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा आणि देखरेखीचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अत्याचारामुळे ही विद्यार्थिनी गरोदर राहिली होती.
या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला कमालीची गुप्तता पाळली होती.
( नक्की वाचा : Dombivli News: आधी डिस्चार्ज ठरला, मग अचानक निर्णय बदलला; अटकेत असलेल्या Ramesh Mhatre ला वाचवतोय तरी कोण? )
या अत्यंत गंभीर प्रकरणाबाबत आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधितांची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आश्रम शाळेच्या प्रशासनाकडून कुठे हलगर्जीपणा झाला आहे का, याची तपासणी सध्या केली जात आहे.
आरोग्य तपासणी यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह
निवासी आश्रम शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमितपणे दैनंदिन आरोग्य तपासणी केली जाते. असे असतानाही सदर विद्यार्थिनी गरोदर राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला, तरीही एवढी मोठी बाब आश्रम शाळा प्रशासनाच्या, शिक्षकांच्या किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही, याबाबत आता तीव्र आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. या निष्काळजीपणामुळे आश्रम शाळांमधील देखरेख व्यवस्था किती खिळखिळी झाली आहे, हेच स्पष्ट होत आहे.
( नक्की वाचा : Poisonous Snakes: पावसाळा सुरू होताच जमिनीखालून बाहेर पडतात 'हे' 4 यमदूतासारखे साप, वाचा कसा करणार स्वत:चा बचाव )
आदिवासी निवासी आश्रम शाळांमध्ये राज्यातील दुर्गम भागातील हजारो गरीब व वंचित कुटुंबातील मुली शिक्षणासाठी राहतात. मात्र, अशा सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच जर मुली सुरक्षित नसतील, तर पालकांनी त्यांच्या मुलींना कुठे पाठवायचे, असा उद्विग्न प्रश्न आता विचारला जात आहे. या संवेदनशील प्रकरणाची केवळ खातेअंतर्गत चौकशी न करता, वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या प्रत्येक घटकावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world