HSC Board Paper Leak in Nagpur: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच नागपुरातून पेपरफुटीची मोठी बातमी समोर आली आहे. विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेच्या वेळेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर उपलब्ध झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
'सेंट उर्सुला' केंद्रावर असा झाला पर्दाफाश
गुरुवारी केमिस्ट्रीचा पेपर सुरू असताना सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. परीक्षेदरम्यान एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात होती. तिच्या या हालचालींमुळे तेथील पर्यवेक्षकांना संशय आला. महिला शिक्षिकेच्या माध्यमातून या विद्यार्थिनीची झडती घेतली असता, तिच्याकडे एक स्मार्टफोन सापडला. तो तपासला असता, त्यामध्ये परीक्षेच्या तासाभरापूर्वीच आलेला केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिसला.
(नक्की वाचा- कोकणवासियांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी 1 मार्चपासून सेवेत; चेक करा वेळापत्रक आणि तिकीट)
15 विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप आणि मास्टरमाईंड शिक्षक
पोलिसांनी मोबाईल अधिक तपासाला असता, त्यामध्ये 15 विद्यार्थ्यांचा समावेश असलेला एक व्हॉट्सअॅप ग्रुप आढळून आला. संबंधित विद्यार्थ्यांनींची चौकशी केली असता, शहरातील एका खाजगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकाने पैसे घेऊन हा पेपर फोडल्याची कबुली त्यांनी दिली. या ग्रुपमधील इतर 13 विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर पेपर सोडवत होते. पोलिसांनी त्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
(नक्की वाचा- Sambhajinagar Crime: मुलीचा बोचरा प्रश्न अन् रागात आईने केली हत्या; गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं!)
पोलीस तपास आणि गुन्हा दाखल
केंद्रप्रमुखांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान केवळ केमिस्ट्रीच नव्हे, तर याआधी झालेला फिजिक्सचा पेपरही अशाच पद्धतीने फुटल्याची माहिती समोर आली आहे. हा केवळ एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित नसून, यासाठी मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.