Nagpur Crime: नागपूरमधून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील ताजबाग परिसराजवळ असलेल्या एका मदरसा शिक्षकाने तिथे शिकणाऱ्या तब्बल 10 अल्पवयीन विद्यार्थ्यांचा विनयभंग करत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विकृत प्रकारामुळे नागपूर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस कारवाईच्या भीतीने आरोपी सध्या फरार झाला आहे.
मध्य प्रदेशातील 16 वर्षीय पीडित मुलामुळे प्रकरण उघडकीस
हा संपूर्ण प्रकार मध्य प्रदेशातील एका 16 वर्षीय पीडित मुलाने धाडस दाखवून मदरसा व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानंतर उघडकीस आला. गुन्हा दाखल झालेल्या आरोपी शिक्षकाचे नाव अताय रसूल ऊर्फ तालिफ असे आहे. पीडित 16 वर्षीय मुलगा अरेबिक आणि उर्दू भाषा शिकण्यासाठी ताजबाग येथील तोहित नगरमधील गौसिया कॉलनीत असलेल्या मदरसात आला होता. तो येथील वसतिगृहात इतर मुलांसोबत राहत होता.
(नक्की वाचा- Pune News: पाणीटंचाईमुळे पाण्याचे दुर्भिक्ष! त्यात नवी अडचण, पुणेकरांचं टेन्शन वाढलं)
वसतिगृहात रात्रीच्या वेळी करायचा गैरप्रकार
तक्रारीनुसार, 18 जून 2016 रोजीच्या पहाटे 3 वाजताच्या सुमारास आरोपी शिक्षक अताय रसूल हा मुलांच्या वसतिगृहात शिरला. तिथे गाढ झोपेत असलेल्या पीडित मुलाचा त्याने विनयभंग केला. जेव्हा या मुलाने दचकून जागे होत या प्रकाराला तीव्र प्रतिकार केला, तेव्हा आरोपीने त्याला जीवे मारण्याची आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. पीडित मुलाला धमकावल्यानंतर, आरोपीने त्याच रात्री शेजारीच झोपलेल्या दुसऱ्या एका निष्पाप मुलासोबतही असाच गंभीर गैरप्रकार केला.
कारवाईच्या भीतीने आरोपी फरार
दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित मुलाने रात्री घडलेला सर्व प्रसंग मदरसा व्यवस्थापकाच्या कानावर घातला. व्यवस्थापकाने तात्काळ अताय रसूल याला बोलावून त्याची कडक शब्दांत कानउघाडणी केली. मात्र, या प्रकरणाची पोलीस तक्रार होणार असल्याची कुणकुण लागताच, आरोपी अताय याने मदरसा सोडून तिथून पळ काढला.
(नक्की वाचा- Monsoon Update: मुंबईकरांनो छत्री-रेनकोट तयार ठेवा, अखेर मान्सून धडकणार! हवामान विभागाची मोठी अपडेट)
तब्बल 10 मुले आढळली पीडित
पीडित मुलाच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी तातडीने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच 'पोक्सो' आणि भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला. पोलिसांच्या तपासात केवळ एक किंवा दोन नव्हे, तर आरोपी अताय रसूल याने अशाच पद्धतीने मदरसात राहणाऱ्या तब्बल 10 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. सक्करदरा पोलीस फरार आरोपी शिक्षकाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकांद्वारे तपास करत असून, त्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world