Nagpur News : विदर्भात उन्हाचा तडाखा असह्य झाला असून नागपूरचे तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअसच्या स्तरावर गेले आहे. उष्णतेच्या लाटेची ही गंभीर स्थिती पाहता नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आजपासून नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी 10.30 वाजता सुटणार आहेत.
उष्णतेच्या लाटेचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून नागपुरात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. काही दिवसांपूर्वी पारा 44 अंशांच्या पुढे गेल्याने प्रशासनाने एक दिवस शाळा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता शैक्षणिक वेळापत्रक कोलमडू नये आणि विद्यार्थ्यांचे आरोग्यही जपले जावे, यासाठी शाळा सकाळी लवकर भरवून 10.30 वाजता सोडण्याचा मध्यममार्ग प्रशासनाने निवडला आहे.
(नक्की वाचा- Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)
पालकांचे प्रश्न
प्रशासनाने हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतला असला, तरी पालकांकडून काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. साडेदहा वाजता शाळा सुटली तरी विद्यार्थ्यांना घरी पोहोचेपर्यंत 11 किंवा 11.30 वाजतात. तोपर्यंत उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली असते. शाळा सकाळी भरल्यानंतर 10.30 ला सोडणार असल्यास केवळ दोन-अडीच तासांचाच वेळ अभ्यासासाठी मिळतो. एवढ्या कमी वेळेत काय साध्य होणार? असा प्रश्न पालक विचारत आहेत. तीव्र उन्हात मुलांना घरी नेण्यापेक्षा शाळा सकाळी लवकर भरवून 10 पूर्वीच सोडावी किंवा ऑनलाईन वर्ग घ्यावेत, अशाही सूचना काही पालकांनी केल्या आहेत.
(नक्की वाचा- Pune News: रिंग रोडसाठी शेतकरी कुटुंबाला रस्त्यावर आणलं; डोळ्यासमोर संसार उद्ध्वस्त)
प्रशासनाची भूमिका
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले आहे की, मुलांचे उष्माघातापासून संरक्षण करणे ही आमची प्राथमिकता आहे. दुपारच्या कडक उन्हात मुलांचा प्रवास टाळण्यासाठी 10.30 ची वेळ निश्चित केली आहे. तरीही, परिस्थितीनुसार शाळांना लवचिकता देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world