जाहिरात

Nashik Rain: पहिल्याच पावसात नाशिककरांची दाणादाण; कुंभमेळ्यासाठी खोदलेल्या रस्त्यांत वाहने रुतली

Nashik Rain Update: नाशिकमध्ये जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) मान्सूनपूर्व नियोजनाचे पूर्णपणे वाभाडे काढले आहेत.

Nashik Rain: पहिल्याच पावसात नाशिककरांची दाणादाण; कुंभमेळ्यासाठी खोदलेल्या रस्त्यांत वाहने रुतली

पहिल्याच मुसळधार पावसात नाशिक महानगरपालिकेच्या कारभाराचे पुरते वाभाडे निघाले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी खोदण्यात आलेले रस्ते आता वाहनधारकांसाठी जीवघेणे सापळे बनले आहेत. सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहने चिखलात आणि खड्ड्यांत फसत असून शहरात तासनतास वाहतूक कोंडी होत आहे.

ना बॅरिकेट्स, ना सुरक्षा

शहरातील सद्यस्थिती पाहता महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी शहरात अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या खोदलेल्या भागांत प्रचंड चिखल झाला असून, वाहनांची चाके त्यात रुतून बसत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी रस्ते खोदले आहेत, तिथे महापालिकेकडून ना कोणते बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत, ना सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. शहराच्या प्रमुख चौक आणि महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवरच गाड्या फसण्याचे प्रमाण वाढल्याने संपूर्ण नाशिक शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

(नक्की वाचा- Nitin Gadkari: ना पेट्रोल, ना डिझेल, ना CNG, आता कचऱ्यावर धावणार बस! इथेनॉलनंतर नितीन गडकरींची मोठी घोषणा)

महापालिकेचा 'टास्क फोर्स' गायब

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने मोठ्या गाजावाजा करत 'टास्क फोर्स' स्थापन केला होता. मात्र, प्रत्यक्ष शहरात चिखल आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असताना पालिकेचा हा टास्क फोर्स पूर्णपणे गायब असल्याचे चित्र आहे. प्रशासनाचा हा टास्क फोर्स केवळ एक 'फार्स' ठरल्याची टीका नाशिककर करत आहेत.

(नक्की वाचा-  Dombivli News: शिंदे गटाच्या नगरसेवकाची गुंडगिरी; महिला डॉक्टर आणि नर्सना रुग्णालयात घुसून मारहाण)

याशिवाय, सततच्या पावसामुळे नाशिक शहरातील अनेक सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. ड्रेनेज लाईन चोक झाल्यामुळे काही निवासी भागांतील घरांमध्येही पावसाचे घाण पाणी शिरल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. हवामान खात्याने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने, पालिकेने तातडीने रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करावी आणि पाणी उपसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com