जाहिरात
This Article is From Oct 07, 2024

नवी मुंबई विमानतळाचं नावं ठरलं! सर्वपक्षीय समितीसमोर केंद्रीय मंत्र्यांची ग्वाही

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबई विमानतळाचं नावं ठरलं! सर्वपक्षीय समितीसमोर केंद्रीय मंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे, प्रतिनिधी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी याबाबत ग्वाही दिली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समितीसोबत दिल्लीत बैठक झाली. त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी हे आश्वासन दिलं. याबाबतची नामकरण प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार असल्याचं नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी  स्पष्ट केलं.

नवी मुंबईच्या विमानतळाला केंद्र सरकार दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात सकारात्मक असून लवकरात लवकर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समितीला दिलं. या बैठकीला रामशेठ ठाकूर, मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप खासदार धैर्यशील पाटील, संजीव नाईक, प्रशांत ठाकूर आणि दि बा पाटील यांचे सुपूत्र अतुल पाटील उपस्थित होते.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'आचारसंहितापूर्वी नामकरण व्हावं'  रामशेठ ठाकूर

दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारनं स्वतःहून बैठक बोलविली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीसाठी प्रयत्न केले. नवी मुंबईतील 95 गावांमधील लोकांची ही भावना आहे आम्ही 4-5 वर्षापासून संघर्ष करत आहोत.  विधानसभा आणि विधानपरिषदेत ठराव पास झाला होता. मला अपेक्षा आहे की आज चांगला निर्णय होईल. 

नवी मुंबई स्थापन झाल्या पासून दि बा पाटील यांनी रक्त सांडले आहे. स्थानिकांना न्याय देण्यासाठी, त्यांना नोक-या मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नामकरण प्रक्रिया पूर्ण व्हावी अशी आमची मागणी आहे,' असं मत रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केलं. 

( नक्की वाचा : 'मविआची सत्ता आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल', PM मोदींचा थेट आरोप )
 

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव घ्यावं, हे पाच जिल्ह्यातील प्रत्येकाचं मत आहे. या संदर्भात राम मोहन नायडू यांच्याशी बैठक घेतली. मी मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोललो. मला खात्री आहे की सकारात्मक चर्चा झाली आहे. यासाठी अनेक आंदोलनं झाली, रक्त सांडले. दि बा पाटील लोकनेते होते. त्यांचे नाव विमानतळाला असणं महत्त्वाचे आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं. 

काय म्हणाले केंद्रीय मंत्री?

दि. बा पाटील यांच्या नावाशिवाय दुसरा कोणताच प्रस्ताव नाही. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला दि. बा. यांचेच नाव देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होईल. नागरी उड्डाण मंत्रालय दि. बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत पाठपुरावा करेल, असं केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com