नवी मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपरखैरणे परिसरात एका नराधम पित्याने आपल्याच दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मुलींची सुटका केली असून, एका दलालाला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (Anti-Human Trafficking Cell) या प्रकरणी तातडीने कारवाई करत दोन्ही मुलींची सुटका केली आहे.
पोलिसांच्या छाप्यामुळे गुपित उघड
नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात काही अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून छापेमारी केली. छापेमारीदरम्यान 14 आणि 16 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, यामागे याच मुलींचा नराधम बाप असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.
(नक्की वाचा- Actress Arrested: ग्लॅमरच्या आड काळा धंदा! सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्रीला अटक)
आरोपी पिता फरार, दलाल अटकेत
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे येथे राहणारा हा नराधम पिता एका दलालाच्या माध्यमातून आपल्याच मुलींना वेगवेगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दलालाला अटक केली आहे. मात्र, आरोपी पिता सध्या फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
(नक्की वाचा- Exclusive VIDEO: समृद्धी महामार्गावर मृत्यूचा खेळ! स्थानिकांच्या आणि मुलांच्या कृतीमुळे मोठ्या अपघाताचा धोका)
पोस्को आणि पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
या गंभीर प्रकरणी पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (Prevention of Immoral Trafficking Act - PITA) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (Protection of Children from Sexual Offences Act - POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. *गुन्हे शाखेच्या एसीपी प्रेरणा कट्टे* यांनी या कारवाईची माहिती दिली असून, आरोपी पित्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगितले. या घटनेमुळे नवी मुंबईतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.