Ajit Pawar Speech : साडी, ब्लाऊज आणि पेटीकोट... महिला मेळाव्यात अजित पवारांचं तुफान भाषण

महिला मतदार आपल्याला विधानसभेला विजयाच्या जवळ घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या महिला आघाडीचं काम मोठं आहे. जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हायला हवं, असं अजित पवारांनी म्हटलं.

Advertisement
Read Time: 3 mins

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु केली आहे. सरकारच्या योजना महिलांनी घरोघरी ताकदीने पोहोचवल्या पाहिजेत. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी अधिवेशनात अजित पवारांनी असं आवाहन केलं. यावेळी अजित पवारांनी आपल्या विनोदी शैलीत केलेल्या भाषणामुळे उपस्थित महिला पोटधरून हसल्या. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

सरकारच्या योजनांबद्दल बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, कधीकधी आपल्याला वाटतं की काय सारखं साखरं तेच सांगत रहायचं. पण ते सारखं सांगावं लागतं तरच ते लक्षात राहतं. आमच्या ग्रामीण भागात म्हणतात, खुटा हलवून हलवून मजबूत करायचा. तशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. महिलांनी महिलांना सरकारचं काम पटवून दिलं पाहिजे. 

महिला पदाधिकाऱ्यांसाठी खास बक्षिस

अजित पवारांनी महिला पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटलं की, आपला सोशल मीडिया तितका स्ट्राँग नाही. त्यामुळे दररोज एक व्हिडीओ पॉझिटिव्ह प्रचार करणारा अपलोड करा. महिला संघटनेत प्रमोशन, खास बक्षिसे दिली जातील. वरिष्ठांसोबत डिनर दिलं जाईल. ज्या व्यक्तीच्या एका व्हिडीओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळतील, त्यांना आम्ही स्वत: भेटणार. त्या भागात आम्ही दौऱ्यात असताना त्यांच्या घरी आम्ही स्वत: जाणार आणि त्या बहिणीचं कौतुक करणार, असा शब्दही अजित पवारांनी दिला.

(नक्की वाचा -  "मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देणार नाही",  उद्धव ठाकरेंची मागणी 'राष्ट्रवादी'च्या ज्येष्ठ नेत्याने धुडकावली)

महिलांशी संवाद साधला पाहिजे. त्या भावना मतांमध्ये बदलणे महत्त्वाचे आहे. तुम्ही व्हिडीओ बनवताना स्थानिक आमदाराची मुलाखत घ्या. स्थानिकांचे बाईट घ्या आणि आपण आपल्या पक्षाने काय काम केलं ते लोकांपर्यंत पोहचवा. हा कार्यक्रम गंभीरतेने घ्यायचा आहे. अजिंक्य घड्याळ या लाईनवर व्हिडीओ बनवायचा आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.  

Advertisement

साडी, ब्लाऊज, पेटीकोट...

महिला मतदार आपल्याला विधानसभेला विजयाच्या जवळ घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या महिला आघाडीचं काम मोठं आहे. जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हायला हवं. महिलांनी गुलाबी रंगाची साडी आणि त्याला जवळ जाणाऱ्या रंगाचा ब्लाउज घालावा. पिवळा ब्लाऊज घालण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणाल हे काय आणलं नवीन. साडी अशी, ब्लाऊज पण असा. आता पेटीकोट कोणता घालावा असं सांगू नये म्हणजे झालं, अजित पवारांच्या गमतीशीर भाषणानंतर महिलांमध्ये एकच हशा पिकला. 

Advertisement

( नक्की वाचा : 'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार )

राज्यभर फिरताना येत असलेल्या अनुभवाबद्दल सांगताना अजित पवार यांनी म्हटलं की, आम्ही महिलांना विचारतो पैसे आले का? काही महिला पैसे आले असं सांगतात. मात्र ज्येष्ठ महिला म्हणतात आमचं वय 65 च्या पुढे आहे, आम्हाला कुठे काय आहे. त्यांच्यासाठी वयोश्री योजना आहे. त्यात जास्त पैसे दिले जात नाहीत, मात्र ती योजना आपल्याकडे आहे. आम्ही 65 वर्षांपर्यंत लाडकी बहीण योजना लागू केली आहे. त्यापुढे काय करावं याबाबत देखील आम्ही विचार करत आहोत.

Topics mentioned in this article