जाहिरात

Driving License New Rules: 1 ऑगस्टपासून मोठे बदल! ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 'हे' कागदपत्र सक्तीचे, नाहीतर...

Driving License New Rules Maharashtra: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियमावलीची घोषणा केली आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून वाहन परवान्यासाठी एक प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर माहिती...

Driving License New Rules: 1 ऑगस्टपासून मोठे बदल! ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 'हे' कागदपत्र सक्तीचे, नाहीतर...
"Driving License New Rules Maharashtra: महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवे नियम"
Pratap Sarnaik X And Canva
  • वाहनचालक परवान्यासाठी महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य
  • 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार
  • अनधिकृत बाइक टॅक्सी सेवांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू

Driving License New Rules Maharashtra: राज्यात वाहनचालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार महाराष्ट्र अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (7 जुलै) विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, ड्रायव्हिंग परवाना नवीन नियमावलीचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

अनधिकृत बाइक टॅक्सी सेवांवर दंडात्मक कारवाई 

त्याचबरोबर राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत बाइक टॅक्सी सेवांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. या क्षेत्राचे नियमन करून राज्याला महसूल मिळावा आणि तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासन नियोजन करत आहे. या नव्या व्यवस्थेनुसार बाइक टॅक्सी चालकांकडून दररोज पाच रुपये महसूल जमा करण्यात येणार आहे. प्रत्येक राइडमागे दोन रुपये कल्याण निधीसाठी जमा करणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे; तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे किंवा चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांवर परिवहन विभागाकडून कठोर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतुदी

महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियमांमध्ये महिला, विद्यार्थी आणि अल्पवयीन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. बाइक टॅक्सी चालकाकडे मोटार वाहन अधिनियम, 1988च्या कलम 3 नुसार वैध वाहनचालक परवाना; तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम,1989च्या नियम 4 नुसार सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचे अधिकारपत्र (बॅज) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा बॅज देण्यापूर्वी अर्जदाराची पोलीस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम, 2025नुसार अर्जदाराने खासगी दुचाकी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक करता कामा नये; तसेच उर्वरित सर्व अटींची पूर्तता एका महिन्याच्या आत करण्याच्या अटीवर राज्य परिवहन प्राधिकरणाने उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. (रॅपिडो) आणि ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (ओला) या ॲग्रीगेटर कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्रासाठी 30 दिवसांचा तात्पुरता परवाना देण्यास मान्यता दिली होती.

(नक्की वाचा: Pune News: मिसिंग लिंक अन् सुरक्षेचे 13 प्रश्न! 'या' नेत्याने एका फटक्यात फेटाळला होता मिसिंग लिंक प्रस्ताव)

2.31 लाख रुपयांचा दंड वसूल 

अनधिकृत बाइक टॅक्सी सेवा रोखण्यासाठी परिवहन विभागाने आणखी कठोर भूमिका घेतली आहे; तसेच राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वायुवेग पथकांकडून परवान्याशिवाय बाइक टॅक्सी सेवा चालवणाऱ्या वाहनचालकांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत 814 दोषी वाहने आढळून आली. त्यापैकी 151 वाहने जप्त करण्यात आली असून 14 गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले. या कारवाईत 16.25 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर एप्रिल 2026 ते मे 2026 या दोन महिन्यांत 211 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी 66 वाहने जप्त करण्यात आली आणि 2.31 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

(नक्की वाचा: Mumbai News: मुंबईत आज शाळा बंद आणि वर्क फ्रॉम होम; 'तो' व्हायरल मेसेज पूर्णपणे खोटा; BMC चं स्पष्टीकरण)

राज्यात बाइक टॅक्सी सेवा कायदेशीर चौकटीत आणून प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे नियमन, महसूल वाढ आणि युवकांना रोजगार या चारही बाबी साध्य करण्यासाठी शासन सर्वंकष धोरण राबवत असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य दिलीप लांडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सरनाईक बोलत होते. 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com