आज विधानपरिषदेच्या निवडणूका पार पडल्या. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांचं मतदान चर्चेत राहिलं. भर पोलीस ठाण्यात गोळी झाडणाऱ्या आणि हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गणपत गायकवाड यांना मतदानाला परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र तरीही गणपत गायकवाड यांनी मतदान केलं. या प्रकरणानंतर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना तुरुंगात असताना मतदानाची परवानगी दिली नसल्याने सत्ताधाऱ्यांकडून अन्याय केला जात असल्याची भूमिका विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे.
20 जून 2022 रोजी विधान परिषद निवडणुकीचा आखाडा आजच्या सारखाच तापला होता. तेव्हा मविआच्या गटातून अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुरुंगात होते. दोघांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सत्ताधारी निवडणूक आयोगासमोर विनवण्या करत होते. पण निवडणूक आयोगाने मतदानासाठी परवानगी दिली नाही. पुढे मविआचा उमेदवार पडला. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं आणि महाराष्ट्राला एकावर एक राजकीय भूकंपाचे हादरे बसले.
आज पुन्हा एकदा परिषदेचं रण तापलंय. यावेळी महायुतीच्या गटातून गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. मात्र गणपत गायकवाडांना तळोजा तुरुंगातून विधान भवनात आणण्यात आलं. विरोधक निवडणूक आयोगावर भेदभाव केल्याचा आरोप करत राहिले आणि गणपत गायकवाड मतदान करून निवांतपणे निघूनही गेले.
नक्की वाचा - Video : 'आपण परत यायलाच पाहिजे' संजय राऊत, चंद्रकांत पाटलांना काय म्हणाले?
अनिल देशमुखांना एक न्याय आणि गणपत गायकवाडांना वेगळा न्याय का? असा सवाल विरोधक करतायत. यावर गणपत गायकवाडांनी मतदान करणं हा त्यांचा हक्क असल्याचं भाजप नेत्यांचं स्पष्ट मत आहे. मग अनिल देशमुखांना मतदानाच्या हक्क का बजावता आला नव्हता.. अनिल देशमुख आणि गणपत गायकवाड या दोन्ही आमदारांच्या प्रकरणांवरही एक नजर टाकुयात..
अनिल देशमुखांवरचे आरोप
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर अनिल देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणात अनिल देशमुखांनी दीड वर्षाचा तुरुंगवास भोगला. दीड वर्षानंतर ईडीच्या तपासात काहीच तथ्य आढळलं नाही. 100 कोटींचा घोटाळा थेट 1 कोटींवर आल्यामुळे देशमुखांची सुटका झाली.
गणपत गायकवाडांवर आरोप काय?
दुसरीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात तुरुंगात आहेत. गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केला होता. भर पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेजही आहेत. शिवाय गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली होती.
यानंतर गणपत गायकवाडांची तळोजा तुरुंगात रवानगी झाली होती.
म्हणजेच तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या कथित आरोपांमुळे अनिल देशमुखांना मतदान करता आलं नाही. मात्र स्वत: गोळीबाराच्या गुन्ह्याची कबुली देणारे आमदार गणपत गायकवाड मतदान करू शकतात. निवडणूक आयोगाची हीच भूमिका आता वादाच्या भोवऱ्यात आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world