VidhanParishad Election 2024 : विधानपरिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी शुक्रवारी विधिमंडळात मतदान सुरु आहे. या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपले सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा केलाय. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करण्यास विरोधी पक्षानं आक्षेप घेतला होता. त्यामुळे काही काळ पेच निर्माण झाला होता.
विधानपरिषद निवडणुकीच्या गडबडीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील एकमेकांच्या समोर आले. आपल्या जु्न्या मित्र पक्षातील नेत्याला पाहून संजय राऊत यांची कळी खुलली. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचं हसून स्वागत केलं.
( नक्की वाचा : विधानपरिषद निवडणूक : जागा 11, उमेदवार 12, कुणाचा होणार बकरा? वाचा संपूर्ण समीकरण )
संजय राऊत यांनी यावेळी 'अरे व्वा, आपण परत यायला पाहिजे,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांच्याशी हस्तांदोलन केलं. चंद्रकांत पाटील यांनीही पुढं येत त्याचा स्विकार केला. 'हे तुमचं वाक्य असेल तर ही लाईन होणार आहे,' असं पाटील यावेळी म्हणाले. त्यावर मी नेहमीच लाईन देतो, असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. दोन्ही नेत्यांच्या आजूबाजूला असलेल्या सर्वांनी हसून दाद दिली. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
फडणवीस-ठाकरे आले होते एकत्र
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाचवेळी लिफ्टजवळ आले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकत्र लिफ्टनं वरचा मजला गाठला. लिफ्टमध्ये त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? यावर वेगवेगळे अंदाज बांधले गेले होते.
ही घटना ताजी असतानाच विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world