पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळतीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. काल रात्री उशीरा आरती फार्मा लॅब या नामांकित कंपनीत डाय मिथाईल सल्फेट (Dimethyl Sulfate – DMS) या अत्यंत विषारी रसायनाची गळती झाली. या गॅसच्या संपर्कात आल्याने 12 ते 15 कामगारांना विषबाधा झाली आहे. बाधित कामगारांवर बोईसरमधील अधिकारी लाइफ लाइन्स रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
कंपनी प्रशासनावर 'माहिती दडपल्याचा' आरोप
धक्कादायक बाब म्हणजे, वायू गळतीनंतर कंपनी प्रशासनाने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तारापूर एमआयडीसीत वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे “कामगारांच्या जीवाशी खेळ” सुरूच असल्याची तीव्र टीका होत आहे.
(नक्की वाचा- Gold Rate Today: सोन्याच्या दरात एका दिवसात 8 हजार रुपयांची घसरण; चेक करा नवे दर)
'डाय मिथाईल सल्फेट' का आहे धोकादायक?
डाय मिथाइल सल्फेट हे द्रवरूप रसायन आहे, पण गळतीनंतर त्याच्या विषारी वाफेमुळे ते गॅससारखे धोकादायक ठरते. डाय मिथाइल सल्फेट हा अत्यंत विषारी आणि घातक रसायन आहे. गळती झाल्यावर त्याच्या संपर्कात आल्यावर आणि वातावरणातील ओलावा/पाण्याशी प्रतिक्रिया झाल्यावर धोकादायक वायू तयार होऊ शकतात.
DMS 'सायलेंट किलर'
DMS हवेत पसरतो आणि थेट विषारी वाफ स्वरूपात शरीरात प्रवेश करतो. तसेच, पाण्याशी किंवा ओलाव्याशी प्रतिक्रिया झाल्यास मेथॅनॉल (Methanol) आणिसल्फ्युरिक ऍसिड (Sulfuric Acid) तयार होऊ शकतात. हा वायू डोळे, त्वचा आणि श्वसनमार्गाला गंभीर इजा पोहोचवतो. श्वासाद्वारे शरीरात गेल्यास फुफ्फुसांवर परिणाम, श्वास घेण्यास त्रास शिवाय, उशीराने गंभीर लक्षणे दिसू शकतात. DMS ला 'सायलेंट किलर' म्हणतात. कारण सुरुवातीला लक्षणे कमी दिसतात, पण नंतर गंभीर परिणाम होतात.
(नक्की वाचा- Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर)
2 मार्च रोजीही झाली होती वायूगळती
याआधी 2 मार्च रोजी तारापूर MIDC मधील भगेरिया केमिकल्स या कंपनीमधून ओलियम वायूची गळती झाली होती. ज्यामुळे बोईसर, खैरेपाडा, सरावली भागातील सुमारे 5 किलोमीटर परिसर बाधित झाला होता. अनेक कामगारांना याचा त्रास झाला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world