बदलापुरातील (Badlapur Child Abuse) शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक शोषणासारख्या घृणास्पद कृत्याचा निषेध करण्यासाठी बदलापुरातील नागरिकांनी आंदोलन पुकारलं होतं. या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यात पोलिसांनी बारा तास लावले, याशिवाय शाळेच्या संस्थाचालकांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. संस्था चालकांनी चार दिवसांनी कारवाई केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
बदलापुरातील नागरिकांनी पुकारलेल्या या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बदलापुरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभाग घेतला आहे, त्यांना गुन्हेगार म्हणणं आणि त्यांच्याविरोधात खटले दाखल करणं योग्य नसल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. बदलापुरातील घटनेने देशभरात हळहळ व्यक्त केली जात असताना अशातून उभ्या राहिलेल्या आंदोलनाला राजकियदृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हणणं धक्कादायक असल्याचं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
बदलापुरात झालेली घटना दुर्देवी आहे. यातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र बदलापुरात झालेलं आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा गदारोळ माजण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - महिला पत्रकाराशी अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या बदलापुरातील माजी नगराध्यक्षांवर काय कारवाई होणार?
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बदलापुरातील चिमुरड्यांशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीविरोधाक पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवलं जाणार आहे. याशिवाय एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून दिरंगाई केल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र बदलापुरातील आंदोलनात स्थानिकांची संख्या बोटावर मोजण्या इतकी होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे पोटशूळ उठत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केला.