
अविनाश पवार, प्रतिनिधी
दिवाळीचा सुट्टीचा काळ सुरू होताच पुण्यातले रस्त्यावरुन गर्दी अचानक कमी झाल्याचं दिसून येत आहे. एरवी वाहनांच्या प्रचंड गर्दीने गजबजलेले रस्ते आता अगदी शांत आणि निर्मनुष्य झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शिवाजीनगर, जे.एम. रोड, एफ.सी. रोड, युनिव्हर्सिटी रोड, बाणेर, कोथरूड यांसारख्या प्रमुख मार्गांवर वाहनांची संख्या अत्यंत कमी दिसत आहे. नेहमीच पायी रस्ता ओलांडणे कठीण असणाऱ्या या ठिकाणी सध्या लोक सहजपणे चालताना दिसत आहेत. वाहतुकीची कोंडी नाही, हॉर्नचा गोंगाट नाही – जणू पुणे शहराने स्वतःसाठी ‘दिवाळीचा मोकळा श्वास' घेतलाय अशी प्रतिक्रिया पुणेकरांकडून दिली जात आहे.
रिकामे रस्ते आणि पुणेरी टोमणे
या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी त्यांच्या खास ‘पुणेरी स्टाईल'मध्ये सोशल मीडियावर विनोदी पोस्ट्स आणि टोमणे मारायला सुरुवात केली आहे. काही जणांनी लिहिलंय — “बाहेर गावच्यांनो, आता पुण्यात येऊच नका… आमचे रस्ते अखेर मोकळे झालेत!” तर काहींनी फलकच लावलेत —“पुण्यात स्वागत आहे… पण दिवाळीनंतरच या!” सोशल मीडियावर हे ‘पुणेरी टोमण्यांचे फलक' मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नक्की वाचा - Pune News 'काका, मला वाचवा'ची आरोळी घुमणाऱ्या शनिवारवाड्यावर धार्मिक वाद! काय आहे पेशव्यांच्या वाड्याचा इतिहास
पुण्यातील मोकळ्या रस्त्यांचे फोटो व्हिडीओ व्हायरल
वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, दिवाळी सुट्टीत अनेक विद्यार्थी आणि कामगार बाहेरगावी गेले असल्याने शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसही काहीसे ‘निवांत' झालेत, असं विनोदीपणे पुणेकर म्हणताना दिसतात. एकूणच, दिवाळीच्या उत्सवात पुणेकरांना मिळालेला हा “ट्रॅफिक-फ्री आनंद” त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणतोय आणि शहरातील रस्तेही काही दिवसांसाठी तरी खरंच ‘मोकळा श्वास' घेतायत अशी प्रतिक्रिया दिली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world