जाहिरात

Pune : हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कशी सोडवणार? अजित पवारांनी सांगितला प्लॅन

Pune hinjewadi traffic jam solution: पुणे शहरातील हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Pune : हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कशी सोडवणार? अजित पवारांनी सांगितला प्लॅन
पुणे:

Pune hinjewadi traffic jam solution: पुणे शहरातील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (आयटी पार्क) हिंजवडी परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सध्या चांगलाच तीव्र झाला आहे. उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार, 26 जुलै 2025) आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय याबाबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 

माण, म्हाळुंगे, सूस आदी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात. मेट्रोची सुरु असलेली कामे गतीने पूर्ण करावीत. विविध विकास कामे आणि रस्त्याची कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. 

कशी सोडवणार वाहतूक कोंडी?

अजित पवार यांनी या बैठकीत सांगितलं की, ' या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता दूरगामी विचार करून रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करावीत. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे. नाले, ओढ्याच्या काठावरील अतिक्रमण काढण्यासह राडारोडा काढून नैसर्गिक पाण्याचे प्रवाह मोकळे करावे. कामात अडथळा आणणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी. 

नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार करता येत्या काळात त्यांना पायाभूत सुविधा मिळ्याच्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणेने समन्वयाने काम करावे. सद्यस्थितीत रस्त्याच्या दोन्ही बाजुच्याकडेला तसेच अंडरपासखाली वाहने थांबणार नाही, तसेच जड आणि अवजड वाहतुकीचे नियोजन करावे. वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना अमंलबजावणीकरिता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

( नक्की वाचा: Pune News : हिंजवडीमधील कामांना उशीर झाला तर खैर नाही, 'या' कायद्यांतर्गत होणार कारवाई )
 

वाढत्या नागरीकरणाचा विचार करुन रस्ते, पाणी, रुग्णालये, शाळा, मलनिस्सारण प्रकल्प, कचरा, वाहतूक, प्रदूषण आदी बाबींचा शहर नियोजन आराखड्यात समावेश करावा. कासारसाई कालवा बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील शिक्के कमी करण्यात येतील, मंत्रालय स्तरावरील मंजुरी प्रस्तावाबाबत संबंधित विभागाचे मंत्री, सचिव आदींसोबत बैठक घेऊन त्यामध्ये सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितलं.

आगामी काळातील पुण्याची लोकसंख्या आणि दळणवळणाच्या सुविधांचा विचार करून पुणे महानगर क्षेत्र, हिंजवडीसह औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणीवर भर देणे गरजेचे आहे. पीएमआरडीएने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढल्यामुळे हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर होत आहे, त्याच प्रमाणे सर्व संबंधित व‍िभागाने देखील अतिक्रमणासंदर्भात ठोस भूमिका घेऊन वाहतूक कोंडी दूर करण्याचे निर्देश श्री. पवार यांनी दिले.

ह‍िंजवडी भागातील विकास कामांची पाहणी

या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पुणे मेट्रो लाईन ३, स्थानक क्र. ६, क्रोमा, हिंजवडी, क्रोमा ते मेझानाईन ते लक्ष्मी चौक ते शिंदे वस्ती ते मारुंजी रोड, मारुंजी रोड - कासार साई (कॅनॉल) विप्रो सर्कल फेज-२, विप्रो सर्कल फेज-२ - स्थानक क्र. ०३, डोहलर कंपनी, डोहलर कंपनी हिंजवडी फेज ३ माण गाव-पांडवनगर नगररचना रस्ता, नगररचना रस्ता ते प्राधिकरण आकुर्डी कार्यालयादरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि सुरु असलेल्या विविध विकासकामाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com