लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे आत्तापर्यंत पूर्ण झाले आहेत. आणखी चार टप्पे बाकी आहेत. सर्वच राजकीय पक्ष सध्या जोरदार प्रचार करत आहेत. त्याचवेळी मतदानाबात फेक न्यूज पसरवण्याचा खोडसाळपणा देखील काही जण करत आहेत. मतदार यादीतील नावावर डीलीट असा शिक्का मारला असल्यास करावयाच्या कार्यवाहीची चुकीची माहितीबाबतचा संदेश व्हॉट्सअपद्वारे प्रसारीत केल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्यादृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनानं ही माहिती दिली आहे. याबबात चुकीचे संदेश, अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनानं दिलाय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्रमांक 17 चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश संबंधित व्यक्तीने व्हॉट्सअपद्वारे पसरविला आहे. या मेसेजमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. हडपसर येथील मतदार नोंदणी कार्यालयात नागरिकांनी चौकशीसाठी गर्दी केली होती. त्यानंतर प्रशासनानं ही कारवाई केलीय. या प्रकारचे संदेश जिल्ह्यात पसरविले जात असल्याचे निदर्शनास आले असून अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
( नक्की वाचा : माजी नगरसेवकांच्या तिरंगी लढतीमध्ये पुण्याचा कारभारी कोण होणार? )
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीबाबत विशेष संक्षिप्त मोहीम 2024 अंतर्गत मतदार नोंदणी, वगळणी आणि दुरुस्तीबाबत सर्व विधानसभा मतदार संघात गेली वर्षभर काम करण्यात आले आहे. त्यानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत. मतदाराचे नाव वगळणी करताना नियमानुसार सर्व कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप संदेशाद्वारे प्रसारीत केलेली माहिती अत्यंत चुकीची आहे, असे स्पष्ट करुन संबंधित व्यक्तीला याबाबत खुलासा 24 तासात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खुलासा प्राप्त न झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.
मतदार यादीत नाव नसेल संबंधितास मतदान करता येणार नाही. मतदार यादीत नाव असल्यास मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या 12 पुराव्यापैकी एक दाखवून मतदान करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world