रेवती हिंगवे, पुणे
Pune Accident Update: पुणे शहराच्या प्रवेशावर असलेल्या नवले ब्रीज येथे झालेल्या भीषण अपघातामुळे सगळेच सुन्न झाले आहेत. या अपघातामध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश असून त्याच कारमधील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला
मयत झालेल्यांमध्ये स्वाती नवलकर (वय 37), त्यांच्या आई शांता दाभाडे, आणि वडील दत्तात्रय दाभाडे या तिघांचा समावेश आहे. नवलकर कुटुंब हे पुण्यात राहत होते. गुरुवार असल्यामुळे स्वाती नवलकर आणि त्यांचे कुटुंबीय नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये स्वाती नवलकर यांच्या मैत्रिणीच्या तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. याशिवाय, वाहनाचा चालक धनंजय कोळी याचाही मृत्यू झाला आहे.
(नक्की वाचा- Pune Navale Bridge Accident: पुणे नवले ब्रीज अपघातात 7 जणांचा अंत! मृतांची आणि जखमींची नावे समोर)
अपघातात जखमी झालेल्या 15 जणांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर बहुतांश जखमींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. मयत झालेल्या आठ जणांवर त्यांच्या मूळगावी आणि पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
(नक्की वाचा- Solapur Lawyer Suicide: वकीलाच्या आत्महत्येने खळबळ, सुसाईड नोटमध्ये आईवर गंभीर आरोप)
ट्रक चालक, मालकासह क्लीनरवर गुन्हा दाखल
नवले ब्रीज अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. पुणे शहरातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा चालक, मालक आणि क्लीनर या तिघांविरोधात निष्काळजीपणाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अपघाताच्या नेमक्या कारणांचा सखोल तपास सुरू केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world