
लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे शहरात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगीच्या तब्बल 60 हून अधिक घटनांची नोंद झाली. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंतच्या 24 तासांत या घटना घडल्या असून, यातील 42 घटना केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी 5 नंतर घडल्याचे अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सुदैवाने, या कोणत्याही घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही, पण अनेक ठिकाणी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
फटाक्यांमुळे शहराचे अनेक भाग आगीच्या विळख्यात
शहरभर फुरसुंगी, खराडी, कोरेगाव पार्क, भवानी पेठ, नाना पेठ, टिंगरे नगर, बाणेर, मार्केटयार्ड, कात्रज, धानोरी, येरवडा आणि हडपसर यांसारख्या विविध भागांत आगीच्या घटना घडल्या.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
फुरसुंगी येथील एका उंच इमारतीच्या दहाव्या मजल्यावर पेटता रॉकेट येऊन पडला. त्यामुळे गॅलरीतील पडदा पेटला आणि सदनिकेत मोठी आग लागली. रहिवाशांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
खराडीतील गेरा सोसायटीच्या आवारात पडलेल्या पेटत्या फटाक्यामुळे कचऱ्याने पेट घेतला. तसेच, हडपसर लोहमार्गाजवळ पेटत्या फटाक्यांमुळे गवताला आग लागण्याची घटना घडली. गणेश पेठेतील डुल्या मारुती मंदिराजवळील चंद्रकांत शहा अँड कंपनीचे कार्यालय आणि गोदामातही आग लागली होती, जी अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, सायंकाळी 5 वाजल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात आतषबाजी सुरू झाली आणि रात्री 9 वाजेपर्यंत 42 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.
यात हडपसर, वारजे, नन्हे, काळेपडळ, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्री दत्त मंदिराजवळील इमारतींची गच्ची, कसबा पेठेतील कागदीपुरा भागातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर, तसेच विमाननगरमधील संजय पार्क भागात नारळाच्या झाडावर पेटता फटका पडल्याने आग लागली. याव्यतिरिक्त, वडगाव शेरी भागात एका दुचाकीला आग लागणे, धानोरीतील कलवड वस्तीत कचऱ्याला आग लागणे आणि शुक्रवार पेठेतील फडगेट पोलीस चौकीसमोर एका घराच्या छतावर साचलेल्या पाला-पाचोळ्याने पेट घेतल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. या घटनांमुळे दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आतषबाजीवेळी सुरक्षिततेचे नियम पाळणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.