
आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-2026'च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि गतीने तयारीला लागावे, असे निर्देश उपमुखमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. या स्पर्धेमुळे पुणे शहर व जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पटलावर येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' स्पर्धेच्या अनुषंगाने आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा युक्त शीतल तेली उगले, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, या स्पर्धेसाठी आवश्यक रस्त्यांची दुरुस्ती, मार्गाची स्वच्छता, वैद्यकीय सुविधा आदी बाबींवर लक्ष द्यावे. स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रशासनाने वेळोवेळी आढावा घ्यावा. केलेल्या कार्यवाहीची माहिती वेळोवेळी सादर करावी. त्यानुसार आवश्यक तेथे त्रुटींची दुरुस्ती करता येईल, असेही ते म्हणाले.तर विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व सायकलपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्व ती तयारी करण्यात यावी. मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या स्पर्धेच्या अनुषंगाने शहरात रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे, स्पीड ब्रेकर बाबत आवश्यक कार्यवाही आदी कार्यवाही व्हावी असे सांगितले.
शहरातील बहुतांश भागातून स्पर्धेचा मार्ग असल्याने वाहतूक वळविणे, बॅरीकेटिंग आदींच्या अनुषंगाने वेळेत माहिती दिल्यास सर्व पुर्वतयारी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी डूडी यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने सादरीकरण केले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाने पुणे शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनाच्या क्षमता आंतरराष्ट्रीय पटलावर पोहोचणार आहेत. स्पर्धेसाठी युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (युसीआय), स्वित्झर्लंडकडे मान्यतेचा प्रस्ताव पाठविला असून लवकरच मान्यता मिळेल. स्पर्धा युसीआय आणि सीएफआय यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. आगामी ऑलिम्पक स्पर्धेची पात्रता स्पर्धा म्हणून ही स्पर्धा गणली जाणार आहे.
स्पर्धेच्या मार्गाचे शहरात पुणे व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त, ग्रामीण भागात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विविध विभागांद्वारे संयुक्त पाहणी आणि मूल्यमापन करण्यात आले असून सीएफआयनेही रस्त्यांची संयुक्त पाहणी केली आहे. सीएफआयच्या समन्वयाने स्पर्धेचा प्राथमिक मार्ग निश्चित करण्यात आला असून त्यात चर्चेअंती काही बदल करण्यात येतील. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या मानकांप्रमाणे रस्त्यासाठी तयारी करण्यात येईल. पुणे शहर व पिंपरी चिंचवड, मावळ मुळशी पिंपरी चिंचवड, भोर,वेल्हे, मुळशी, पुणे शहर, पुरंदर आणि बारामती अशी चार टप्प्यात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची मोठी पूर्वप्रसिद्धी आणि स्पर्धेदरम्यानही 25 देशात थेट प्रक्षेपण व्हावे असा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटन संस्कृती आणि क्रीडा संस्कृतीला या स्पर्धेमुळे चालना मिळणार आहे, असेही ते म्हणाले.
नक्की वाचा - Viral video:' मराठी येत नाही तर बाहेर निघ', लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार राडा
या स्पर्धेत 50 देशांचे खेळाडू सहभागी व्हावेत असा प्रयत्न आहे. स्पर्धेसाठी भारतातील 40 खेळाडूंना संधी दिली जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 10 खेळाडूंचा समावेश असेल. जगात आंतरराष्ट्रीय सायकल दिन साजरा केला जातो. मात्र भारतात राष्ट्रीय सायकल दिन नसल्याने या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेदरम्यानचा एक दिवस 'राष्ट्रीय सायकल दिवस' म्हणून घोषित केल्यास सायकलिंगला देशात चालना मिळेल, असेही ते म्हणाले. ही सायकल स्पर्धा पाहून प्रेरणा मिळालेल्या नवोदित सायकलपटूंना सराव करता यावा यासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे वेलोड्रम उभारण्यासाठी 35 कोटी रुपयांचा प्रस्ताव केला असल्याचे श्रीमती तेली उगले यांनी सांगितले. यावर या प्रस्तावाला तत्काळ निधी देण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world