
सण उत्सव साजरे करत असताना ध्वनिक्षेपक किंवा इतर अनुषंगाने न्यायालयाने कालमर्यादेबाबत बंधने घातलेली असून त्यातील काही दिवस ठरावीक मर्यादेची शिथिलता देण्यात येते. त्यापैकी अधिकाधिक दिवस गणेशोत्सवासाठी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, तसेच गणेशोत्सव साजरा करत असताना कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2024' बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार हेमंत रासने, शंकर जगताप, श्रीमंती दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने याप्रसंगी उपस्थित होते.
गणेशोत्सव सर्वांना एकत्र करणार आहे, असे सांगून पवार म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव जगातील पावणेदोनशे देशात साजरा केला जातो. जगामध्ये गेलेले भारतीय गणेशोत्सव साजरे करत असतात. नवी पिढीदेखील या उत्सवात मनापासून काम करत असते. आपली भारतीय संस्कृती, परंपरा, सण हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. सर्वांमध्ये आपलेपणा, एकोपा निर्माण करणारे आहेत. त्यातून अनेकांना सामाजिक क्षेत्रात संधी मिळत असते, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. पवार पुढे म्हणाले, गणेश मंडळे वर्षाचे 356 दिवस काम करत असतात. सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जागृतीचा सुंदर सेतू निर्माण करण्याचे काम करतात, ही अभिमानाची बाब आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे समाजसेवेचे शक्तीकेंद्र ठरले आहे. गणेशोत्सवात कोणीही मागे राहू नये यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा.
नक्की वाचा - Kalyan News: स्मार्ट मीटरने दिला वीज बील वाढीचा शॉक, भरमसाठ रकमेमुळे सर्वच हैराण
गणेशोत्सव हा राज्य उत्सव व्हावा यासाठी आमदार रासने यांनी विधानसभेत भूमिका मांडली. मुख्यमंत्री तसेच आपल्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि सर्व सभागृहाने पाठिंबा दिला, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. आपली भूमी साधू, संतांची, वारकऱ्यांची असून कोणतेही गालबोट न लागता उत्सवा साजरा केला जावा. हे करत असताना सामाजिक भान देखील ठेवले पाहिजे. निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आगामी गणेशोत्सव सामाजिक सलोखा राखून, पर्यावरण पूरक साजरा करावा. पर्यावरण संरक्षणासाठी गणेश विसर्जन कृत्रिम हौदात केले जावे, अशी भूमिकादेखील त्यांनी मांडली.
(नक्की वाचा: Malegaon Bomb Blast : 'काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी', मालेगावच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी)
राज्य शासन पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील शहरे आणि राज्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवत आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा आणि पीएमआरडीएचा रिंग रोड, मेट्रोची कामे करण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. विकास कामे करत असताना जमिनीची आवश्यकता लागते. पुणे, पिंपरी चिंचवडच्या भविष्याचा विचार करता त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव कालावधीत मेट्रो सेवा रात्री उशीरापर्यंत व पहाटे लवकर सुरू व्हावी ही मागणी पाहता तथा सूचना मेट्रो प्रशासनाला देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world