- आळंदी येथील इंद्रायणी नदीचे प्रदूषण गंभीर स्वरूपात वाढले आहे.
- इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आढळला आहे.
- स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त केला आहे.
सूरज कसबे
वारकरी संप्रदायाचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या देवाच्या आळंदी येथील इंद्रायणी नदीचे प्रदूषण आता अत्यंत गंभीर वळणावर आले आहे. ही नदी जीवघेणी झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच आढळला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या जीवघेण्या दूषित पाण्यामुळे आता प्रशासन माणसं मरायची वाट पाहणार का? असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. यावर प्रशासनाने तातडीने मार्ग काढावा अशी मागणी करण्यात येत आहे.
इंद्रायणी नदीच्या प्रदूषण पातळीचा धोका पुन्हा एकदा उघड झाला आहे. अनेक कंपन्यांकडून सर्रासपणे रसायनयुक्त दूषित पाणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे इंद्रायणीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या रासायनिक पाण्यामुळे नदी अनेकदा फेसाळते आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. याच जीवघेण्या प्रदूषणामुळे नदीतील जलचर प्राणी तडफडून मरत असल्याचं हृदयद्रावक दृश्य सध्या नदीपात्रात दिसत आहे. मृत माशांचा हा खच इंद्रायणीची सध्याची भयावह स्थिती स्पष्टपणे दर्शवत आहे.
इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी आळंदीकरांनी यापूर्वी अनेकदा मोठी आंदोलने छेडली आहेत. त्यावेळच्या आंदोलनांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी नदी शुद्धीकरणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आश्वासने दिली होती. प्रशासनाच्या याच उदासीनतेचा आणि निष्क्रियतेचा परिणाम म्हणून आज पुन्हा एकदा प्रदूषणाची ही गंभीर समस्या समोर आली आहे. प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या आळंदीकरांनी आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी दर्शविली आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने आणि कठोर कारवाई न झाल्यास येत्या काळात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. नदीत रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
प्रशासनाने तात्काळ करावी अंमलबजावणी
- * नदीत रासायनिक पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
- * प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदीच्या पाण्याची तातडीने तपासणी करावी.
- * दिलेल्या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी त्वरित सुरू करावी.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world