
अविनाश पवार, पुणे
जुन्नरमध्ये वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत डीजे वाहनाने सहा जणांना चिरडलं. यामध्ये एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेला युवक हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा आणि घरचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, संतप्त नागरिकांनी आयोजकांवर कारवाईची मागणी केली आहे.
जुन्नर शहरात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेत डीजे गाडी, ढोल-ताशा पथक आणि गोफनृत्य पथक सहभागी झाले होते. मात्र, या ठिकाणी अचानक डीजे वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने गाडी नियंत्रणाबाहेर गेली. गाडी थेट ढोल-ताशा पथकावर आदळली आणि सहा जणांना चिरडत नेलं. वाद्यांच्या आवाजामुळे वाहन येत असल्याचं अनेकांना लक्षात आलं नाही.
(नक्की वाचा- Hyderabad Crime News: हात-पाय बांधले, कूकरने मारलं, कैचीने गळा चिरला; महिलेला हाल-हाल करून मारलं)
खामगावजवळील आदित्य काळे हा 21 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आदित्य हा घरचा एकुलता एक मुलगा होता. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठं दुःख कोसळलं आहे.
अपघातानंतर संतप्त आदिवासी ठाकर समाजबांधवांनी जुन्नर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केलं. आयोजक व डीजे वाहनचालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी आयोजक देवराम लांडे, अमोल लांडे, डीजे मालक सौरभ शेखरे आणि चालक नामदेव रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बंदी असलेलं डीजे वाहन शोभायात्रेत कसं आलं, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: ब्लॅकमेलिंगला कंटाळून फार्मसिस्ट तरुणीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट)
या अपघातानंतर डीजे वाहनांच्या परवानग्या, सुरक्षा आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जातील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world