जाहिरात

Pune News : आक्षेपार्ह पोस्टनंतर यवतमध्ये तणाव! दुचाकी पेटवल्या, घरं पाडलं; सद्यस्थिती काय?

Pune Yavat Violation : आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याच्या सहकार नगर भागातील घराची तोडफोडही केली, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

Pune News : आक्षेपार्ह पोस्टनंतर यवतमध्ये तणाव! दुचाकी पेटवल्या, घरं पाडलं; सद्यस्थिती काय?

देवा राखुंडे, बारामती

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणात पुन्हा भर पडली आहे. शुक्रवारी सकाळी एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे गावात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर काही दुचाकी जाळण्यात आल्या असून, यवतचा आठवडे बाजार तात्काळ बंद करण्यात आला. सध्या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

नेमकं प्रकरण काय?

यवत गावातील सहकार नगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने शुक्रवारी सकाळी एका समाजाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दुपारी 12 नंतर गावात तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने रस्त्यावर दुचाकी पेटवल्या, तर काही ठिकाणी वाहनांची तोडफोडही केली. यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याच्या सहकार नगर भागातील घराची तोडफोडही केली, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

(नक्की वाचा-  Pune News: 'मल्हार' गडावर बेशिस्त पर्यटकांना जागरूक नागरिकाचा दणका, VIDEO पाहून अभिमान वाटेल)

घटनेची पार्श्वभूमी

यवतमध्ये यापूर्वी 26 जुलै रोजी नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर 27 जुलै रोजी यवतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता आणि 31 जुलैला आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चाच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा आक्षेपार्ह पोस्टमुळे अशांतता पसरली आहे.

व्यापारी वर्गाने देखील आपली दुकाने बंद ठेवत याचा निषेध नोंदवला होता. या घटनेतील आरोपी पोलिसांनी निष्पन्न केला होता त्याच्या शोधकामी दहा पोलीस पथके ही तैनात केली होती. मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपी अमिन पापा सय्यद याला बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अटक केली आहे. आरोपीने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचं दौंड पोलिसांनी सांगितलं आहे.तर अमित सय्यद याला मदत करणारा दारू विक्रेता कामरा गुडावत यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

 याच घटनेच्या निषेधार्थ 31 जुलैला भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चाचे यवत मध्ये आयोजन केले होते.आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप, वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख जगद्गुरु स्वामी हेमांगी सखीजी यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चाही झाला.

आमच्या सभेमुळे हा वाद झाला नाही- संग्राम जगताप

आमदार संग्राम जगताप तणावावर बोलताना म्हटलं की, आमच्या सभेमुळे हा वाद झाला नसून, आक्षेपार्ह पोस्टमुळे ही घटना घडली आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकारामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप करत, अटक केलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि युएपीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवत येथील घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

(नक्की वाचा- Pune News: मुस्लिम माजी सैनिकाच्या कुटुंबावर दहशत माजवण्याचा प्रयत्न, दहशत निर्माण करणारे कोण?)

सध्या परिस्थिती नियंत्रणात

दरम्यान, पोलिसांनी यवतमध्ये जमावबंदी लागू केली असून, 48 तासासाठी ही जमाबंदी राहणार आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज दोन ऑगस्ट रोजी देखील येवतची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे तर संपूर्ण परिस्थितीवर पोलीस देखील लक्ष ठेवून आहेत . वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप गिल यांनी, 'परिस्थिती नियंत्रणात आहे. जाळपोळ करणाऱ्या आरोपींना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील', असे सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com