- पुण्यात पीएमपीएमएलच्या मेक इन पीएमपीएमएल संकल्पनेतून ओपन गॅलरी बससेवा लवकरच सुरू होणार आहे
- या बसमध्ये प्रवाशांना ओपन डेकवर बसून पुण्याच्या ऐतिहासिक वास्तू आणि सांस्कृतिक स्थळं पाहाता येणार.
- पुण्यात ही प्रकारची ओपन गॅलरी बससेवा प्रथमच राबवली जाणार आहे.
पुणे शहर आता लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या जागतिक शहरांच्या पंक्तीत बसण्यासाठी सज्ज होत आहे. त्याला कारण ही तसचं आहे. एक भन्नाट प्रकल्प पुण्यात राबवला जाणार आहे. 'पीएमपीएमएल' (PMPML) लवकरच 'मेक इन पीएमपीएमएल' (Make in PMPML) या संकल्पनेतून ओपन गॅलरी बससेवा सुरू करत आहे. पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष बस सध्या पीएमपीच्या कार्यशाळेत तयार होत आहे. या प्रकल्पामुळे शहरातील पर्यटनवाढीला मोठी चालना मिळणार आहे. शिवाय पीएमपीच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोतही निर्माण होईल.
या बसमध्ये प्रवाशांना बसच्या ओपन डेकवर बसून प्रवास करता येईल. यातून पुणेकर आणि पर्यटकांना पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक स्थळे आणि शहराचे बदलते स्वरूप एका विहंगम दृश्यासह पाहण्याचा अनुभव मिळणार आहे. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरासाठी अशी बससेवा उपलब्ध आहे. मात्र पुण्यात अशा प्रकारची 'ओपन गॅलरी बस' प्रथमच धावणार आहे. ही बस जुन्या वास्तुकला शैलीतील इमारती आणि पर्यटनस्थळांवरून फिरवली जाईल.
ही सेवा सुरू होण्यापूर्वी, मार्गातील काही तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. अनेक ठिकाणी विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या आहेत. ज्या बसला लागू शकतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने प्रथम या मार्गाचे सर्वेक्षण करून हे अडथळे दूर करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आवश्यक सुधारणा झाल्यावर ही बससेवा पुणेकरांना उपलब्ध होईल. ही बससेवा सुरू झाल्यास पुण्याच्या पर्यटनासाठी ती गेमचेंजर ठरेल. शिवाय त्याचा थेट फायदा PMPML ला ही होईल.
अशा पद्धतीची बस सेवा खास करून लंडन शहरात पाहीले जाते. लंडनला जाणार प्रत्येक पर्यटक हा या बसमध्ये बसण्याचा आनंद घेतो. त्यातून प्रवास करत लंडन शहर पहाणे ही एक पर्वणीच समजली जाते. त्यामुळे लंडन आय परिसरात या बसची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसते. पर्यटक ही या बसने प्रवास करण्यास उत्सुक असतात. न्यूयॉर्क शहरात ही अशा पद्धतीची बस सेवा आहे. ओपन डेकवर बसून संपूर्ण न्यूयॉर्क शहराचं दर्शन घडवलं जातं. मुंबईत ही अशी बस आहे. पण ती गेटवे ऑफ इंडिया आणि अजूबाजूच्या परिसरातच फिरते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world