सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune Police Video: कायद्याचे रक्षकच भर रस्त्यात भक्षक बनतात, तेव्हा सामान्य माणसाने कुणाकडे पाहायचे? असाच काहीसा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडेमध्ये तरुणाला पोलिसांकडून झालेल्या वागणुकीमुळे सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. नक्की काय घडलं आणि पोलिसांनी त्या तरुणाला का मारहाण केली, याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
काय आहे प्रकरण?
तळेगाव दाभाडे परिसरातील एका लॉ कॉलेजमध्ये शिकणारा तुषार दळवी हा तरुण आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून प्रवास करत होता. एकाच दुचाकीवर 3 जण म्हणजेच ट्रिपल सीट जात असताना कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना थांबवले. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होतेच, मात्र येथे घडलेला प्रकार काही वेगळाच होता. तुषारने त्याची चूक मान्य केली आणि पोलिसांना विनंती केली की, साहेब, चूक झाली आहे, जो काही नियम असेल त्याप्रमाणे दंड ऑनलाइन पद्धतीने लावा.
( नक्की वाचा : Kalyan News : ती तो अन् तंबाखू, KDMC समोर राडा; निर्दोष तरुणाला भयंकर मारहाण, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं? )
साध्या विनंतीवर पोलिसांचा पारा चढला
मिळालेल्या माहितीनुसार, तुषारने दंड भरण्याची तयारी दर्शवूनही संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्याशी अत्यंत अर्वाच्य भाषेत संवाद साधण्यास सुरुवात केली. पोलिसांची ही अरेरावी पाहून तुषारने आपल्या मोबाईलमध्ये या सर्व प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा व्हिडिओ काढला जात असल्याचे पाहून पोलीस कर्मचाऱ्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी या महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप आता केला जात आहे.
सीसीटीव्हीमध्ये कैद झाला मारहाणीचा प्रकार
ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हायरल होत असलेल्या या फुटेजमध्ये पोलीस कर्मचारी त्या तरुणावर हात उगारताना स्पष्टपणे दिसत असल्याचे बोलले जात आहे. ट्रिपल सीट जाणे ही चूक असली तरी, त्यासाठी रस्त्यावर अशा प्रकारे मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रतिमेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी आपला संताप व्यक्त केला आहे. कायद्याचे रक्षकच जर अशा प्रकारे कायद्याचा गैरवापर करणार असतील, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, अशी विचारणा केली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
इथे पाहा संपूर्ण VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world