काहीना काही कारण काढून भांडण करणे, उपाशी ठेवणे, पाया पडायला लावणे, आई-बहिणीला शिव्या देणे या सगळ्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली होती. पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल या तरुणाची पत्नी कोमल चौधरी आणि सासू शालिनी कृष्णा कोल्हे यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.आय. पेरमपल्ली यांनी कोमल आणि शालिनी यांना भारतीय दंड संहिता कलम 306 (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) सह 34 अन्वये 7 वर्षांची सक्तमजुरी आणि 25,000 रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात मृत इंजिनिअर दीपक चौधरी यांचे सासरे कृष्णा बाजीराव कोल्हे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
नक्की वाचा: घराचा आधारस्तंभ तुम्ही... आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या पाठवा खास शुभेच्छा
दीपकच्या बहिणीने केली होती तक्रार
पिंपरी पोलीस स्टेशन येथे 2016 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, दीपक चौधरी यांनी 24 नोव्हेंबर 2015 रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्या करणाऱ्या दीपकची बहीण, रजनी आशिष राव यांनी त्यांच्या भावाच्या मृत्यूप्रकरणी तक्रार दाखल केली होती. न्यायालयासमोर तक्रारदारांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानुसार, दीपकची पत्नी कोमल हिला छानछोकीचं जीवन आवडत होतं. ती सतत महागडी सौंदर्य प्रसाधने आणि कपड्यांची मागणी करायची, तसेच हॉटेलिंग आणि बाहेर फिरायला जाण्याचा आग्रह धरायची. दीपकने मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्यावर ती त्याच्याशी भांडण करून त्याला उपाशी ठेवत असे.
दीपकला त्रास, आई आणि बहिणीला शिवीगाळ
दीपकने आत्महत्या करण्याच्या दोन दिवस आधी, 22 नोव्हेंबर 2015 रोजी बहिणीला फोन करून त्याला होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितले होते. कोमल सतत दीपकशी भांडायची आणि त्याला कुटुंबातील लोकांशी बोलू देत नसे असे तक्रारीत म्हटले होते. कोमलची आई म्हणजेच दीपकची सासू शालिनी कोल्हे ही तिच्या मुलीला समजावण्याऐवजी तिला प्रोत्साहन देत असे असा आरोप करण्यात आला होता. या दोघी मिळून दीपकला त्रास देत असत, असे तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवादात म्हटले होते. सासू-सासरे हे दीपकच्या त्याच्या आई-बहिणीला शिवीगाळ करत होते असेही तक्रारीत म्हटले होते.
नक्की वाचा: 'मर्द को भी दर्द होता है' आणि हे नॉर्मल आहे! पुरुष दिनानिमित्ताने तो Video पुन्हा चर्चेत
बहिणीला फोन करून दीपक ढसाढसा रडला
दीपकने आत्महत्येपूर्वी त्याची बहीण, मित्र आणि शेजारी यांना पत्नी आणि सासूकडून होत असलेल्या छळाबद्दल वारंवार सांगितले होते. आत्महत्येच्या दोन दिवस आधी, त्याने बहिणीला फोन करून रडत सांगितले होते की त्याला या त्रासातून मुक्त व्हायचे आहे. आत्महत्येपूर्वी, 22 नोव्हेंबर 2015 रोजी दीपकने चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. आत्महत्येच्या दिवशी, 24 नोव्हेंबर 2015 रोजी त्याने बहिणीला फोन करून ‘मला वाचवा, नाहीतर या त्रासाला कंटाळून मी जीव देईन,' अशी विनवणी केली होती. दीपकने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्येही त्याने पत्नी आणि सासू-सासरे आत्महत्येला जबाबदार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. न्यायमूर्तींनी पुरावे, सर्व साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध कागदपत्रे तपासले आणि त्या आधारे दीपकची पत्नी कोमल आणि सासू शालिनी यांनी केलेला छळ हाच दीपकच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला. न्यायालयाने या दोघींना दोषी ठरवले आणि 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.