Raj Thackeray-Uddhav Thackeray Interview: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक संयुक्त मुलाखतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर अत्यंत बोचऱ्या भाषेत टीका केली असून, त्यांना 'मालकाच्या हातावर बसणाऱ्या ससाण्यांची' उपमा दिली आहे.
मुंबईच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मोठी खळबळ उडाली आहे. खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फोडल्याच्या प्रकरणावर आणि भाजपच्या राजकारणावर मनमोकळेपणाने भाष्य केले.
"शिवसेना फोडणे हा कोणता प्रयोग?"
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्थापनेचा उद्देश स्पष्ट करत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "मराठी माणसाचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. राजकारणात पक्षांतरे नवी नाहीत, पण एखादा पक्षच मुळापासून संपवण्याचा प्रयत्न करणे हे अघोरी आहे. आमची माणसे फोडून पक्ष संपवण्याचा हा कोणता प्रयोग आहे?"
(नक्की वाचा- Raj-Uddhav Thackeray Interview: ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र का आले? राज -उद्धव पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले)
"हे ससाणे मालकाच्या इशाऱ्यावर नाचतात"
राज ठाकरे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर 'ससाणे' (शिकारी पक्षी) अशी उपमा देत कडाडून टीका केली. "ससाणा जसा मालकाच्या हातावर बसून शिकार करतो, तशीच ही लोकं दिल्लीत बसलेल्या मालकांच्या सांगण्यावरून स्वतःचीच माणसं फोडत आहेत. स्वकीयांचा घात करणे हे आता राजकीय पक्षांचे काम झाले आहे."
"मराठी माणूस म्हणून तुम्ही कधीच एकत्र येऊ नये, यासाठी जाती-जातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. महाराष्ट्राला कमकुवत करण्याचे हे मोठे राजकारण सुरू आहे", असंही राज ठाकरे म्हणाले.
भ्रष्टाचारावरून देवेंद्र फडणवीसांना टोला
राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तोफ डागली. "देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे घेऊन जाणार होते ना? मग ते पुरावे आता कुठे गेले? ते कोर्टाला का दिले नाहीत?" असा सवाल त्यांनी केला.
(नक्की वाचा- Thackeray Brothers Interview: 'महापौरांनाही सुरतेला उचलून नेतील"; व्हेनेझुएलाचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंचा दावा)
"40 आमदारांसाठी 50 खोके म्हणजे 2 हजार कोटी रुपये होतात. हे पैसे कुठून आले? कोणत्या बँकेतून लोन घेतले होते का?" अशा शब्दात राज यांनी टीका केली. "फडणवीस हे 'आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून' या स्तरावर आले आहेत," अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.
या सर्व नेत्यांचे स्वतःचे काहीच अस्तित्व नसून, त्यांचा संपूर्ण डोलारा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून आहे. ही 'बसवलेली' माणसे असून ती फक्त आपल्या धन्याचा शब्द ऐकतात, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world