महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सांगता सभा शिवडी मतदारसंघात आज पार पडली. बाळा नांदगावकर यांच्यासाठी राज ठाकरे यांनी ही सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवेसना शिंदे गटाचेही आभार मानले. तर शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी म्हटलं की, भाजप आणि शिवसेनेने बाळा नांदगावकरांना शिवडी मतदारसंघाता पाठिंबा दिला आहे. बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार. मला हे आभार बऱ्याच मतदारसंघात मानता आले असते, पण जाऊदे, असं म्हणत राज ठाकरे यांनी महायुतीला टोला देखील लगावला आहे.
(नक्की वाचा- मविआचं सरकार आल्यास बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनंतर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य)
राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं की, राज्यात अनेक ठिकाणी फिरलो. अनेकांशी बोललो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहेत. रस्ते, ट्रॅफिक, शाळा, रुग्णालये, रोजगार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्न राज्यात विषय प्रलंबित आहे. मात्र यातून तुमचं लक्ष दुसरीकडे वळावं यासाठी काही गोष्टींची सोय केली आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
महाराष्ट्र हा हिंदुत्वाने भारावलेला आहे. मात्र हिंदुत्वाने भारावलेल्या महाराष्ट्राला तोडण्याचं काम शरद पवारांनी केलं. त्यांनी जातीत जातीत भेद निर्माण केले. किमान आतातरी तुम्ही सर्वांना सांगा, महाराष्ट्र बाहेर आला पाहिजे. मनसे, भाजप, शिवेसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी नागरिकांना केलं.
(नक्की वाचा- "आमचं ठरलयं...", बारामतीत अखेरच्या क्षणी 'लेटर पॉलिटिक्स')
यूपी-बिहारमध्ये जे राजकारण चालतं तसं महाराष्ट्रात होऊ नये. अत्यंत भीषण आणि घाणेरडी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर या गोष्टी सुरु झाल्या. महाराष्ट्राची संत पंरपरा, एकोप्याची शिकवण, एकत्र राहण्याची शिकवण सगळं आपण यांच्या स्वार्थाच्या राजकारणासाठी विसरून चाललो आहोत. 2019 निवडणूकमध्ये शिवसेना-भाजपला लोकांनी मतदान केलं. मात्र शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी विरोधकांसोबत जाऊन बसली. तुमच्या मताचा तुम्हाला हा अपमान वाटत नाही का? हे कोणतं राजकारण आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.