
MNS News : मराठीच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून आक्रमक झाले होते. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बँकांमध्ये जाऊन तेथील कामकाज मराठी भाषेत होत आहे की नाही हे तपाण्यास सांगितले होते. त्यानंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मनसे कार्यकर्ते कामाला लागले होते. मात्र आता आता राज ठाकरे यांनी आता कार्यकर्त्यांना तर्तास थांबवण्यास सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, मराठी भाषेचा आग्रह धरण्यात गैर काहीच नाही. मात्र जर कोणी कायदा हातात घेतला तर हे खपवून घेतले जाणार नाही आणि योग्य ती कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर काही तासातच राज ठाकरेंनी आंदोलन थांबवण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.
राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना पत्र
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना
सस्नेह जय महाराष्ट्र.
सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन.
मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली.
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना..! pic.twitter.com/bzzCG9c2Np
— Raj Thackeray (@RajThackeray) April 5, 2025
(नक्की वाचा MNS News : मराठी भाषेवरून मनसे आक्रमक, बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी)
पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची ?
(नक्की वाचा- Political News : राज ठाकरेंसोबत तासभर काय चर्चा झाली? उदय सामंतांनी सविस्तर सांगितलं)
आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की.
त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world