
अविनाश पवार
पुणे महापालिकेने 'कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट'ला दिलेल्या जागेच्या गैरवापरावरून निर्माण झालेल्या आरोपांवर सह्याद्री हॉस्पिटलने आपली बाजू स्पष्ट केली आहे. सह्याद्री समूहाचे विधी आणि अनुपालन अधिकारी अमित खातू यांनी NDTV मराठीशी बोलताना सर्व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन हे एकमेव धर्मादाय रुग्णालय असून ते कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टच्या मालकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रस्टच्या जागेचा नव्हे, तर कंपनीच्या शेअर्सचा व्यवहार
खातू यांनी स्पष्ट केले की, 1998 साली 1976 चौरस मीटर जागा ट्रस्टला भाडेकरारावर देण्यात आली होती. त्यावेळी ट्रस्टने जागेच्या बाजारभावाप्रमाणे पूर्ण रक्कम महापालिकेला अदा केली होती आणि 99 वर्षांचे भाडेही दिले आहे. ट्रस्टने करारातील अटी-शर्तींनुसारच रुग्णालय चालवण्यासाठी ते सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडला दिले आहे.
( नक्की वाचा:मराठी माणसे जाऊन राज्याबाहेरची माणसे कशी आली? सह्याद्री हॉस्पिटलबाबतचे गूढ आणखी वाढले )
सध्या जो व्यवहार झाला आहे, तो ट्रस्टच्या मालकीच्या जागेचा कोणताही व्यवहार नसून, सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या इक्विटी शेअर्सबद्दलचा आहे. हे शेअर्स यापूर्वी चार वेळा वेगवेगळ्या कंपन्यांकडे हस्तांतरित झाले आहेत आणि भागधारकांना असा व्यवहार करण्याचा हक्क असल्याचे त्यांनी नमूद केले. करारापूर्वी सर्व अटी-शर्तींचा बारकाईने अभ्यास केला जातो, त्यामुळे कोणत्याही कायद्याचा भंग होण्याची शक्यता नाही, असेही खातू यांनी सांगितले.
गरजू रुग्णांसाठी सुविधा कायम
पुणे महापालिकेने घातलेल्या '50 बेड' मोफत ठेवण्यासंदर्भातील अटीचे आम्ही पालन करतो. पालिकेने पत्र दिलेल्या रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी बेड राखीव ठेवावे लागतात आणि त्यासाठी लागणारी रक्कमही आम्ही बाजूला ठेवत असतो. गरजू रुग्णांवरील उपचारासाठी बाजूला ठेवलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे खर्च होतात, असे खातू यांनी सांगितले. खर्चाचा तपशील धर्मादाय आयुक्तांकडे नियमितपणे सादर केला जातो, त्यामुळे रुग्णांची हेळसांड होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा: महापालिकेने भाड्याने दिलेली जागा सह्याद्री हॉस्पिटलने विकली? )
विश्वस्त मंडळातील बदलांवर स्पष्टीकरण
विश्वस्त मंडळातील बदलांवर बोलताना खातू म्हणाले की, काही विश्वस्त मराठी आहेत, तर काही बिगर-महाराष्ट्रीयन असले तरी ते पिढ्यानपिढ्या पुण्यात राहणारे आहेत आणि त्यांचे येथे व्यवसाय आहेत. त्यांना अमराठी कसे म्हणायचे, असा प्रश्न त्यांनी केला. जर एखाद्या विश्वस्ताला बाहेर पडायचे असेल तर तो बाहेर पडू शकतो, पण विश्वस्त बदलले आहेत असे घडलेले नाही. मूळात ट्रस्टचा व्यवहारच झालेला नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
( नक्की वाचा:मराठी माणसाने उभ्या केलेल्या 'सह्याद्री' हॉस्पिटल साखळीची विक्री, 6,400 कोटींना झाला सौदा )
सह्याद्रीचे शेअर्स ओंटारियो टीचर्स पेन्शन प्लॅन बोर्डकडे आहेत. त्यांच्यात आणि मणिपाल ग्रुपमध्ये करार झाला आहे आणि हा व्यवहार अजून सुरू आहे. ओंटारियो टीचर्स पेन्शन प्लॅन बोर्डचे बहुतांश शेअर्स मणिपालकडे जातील, मात्र कोकण मित्र मंडळाची मालकी कधीच ओंटारियो टीचर्स पेन्शन प्लॅन बोर्डकडे नव्हती आणि मणिपालकडेही नसेल, कारण हा एक ट्रस्ट आहे. गरीब रुग्णांना मंडळातर्फे जे मोफत उपचार दिले जातात, ते पुढे चालू ठेवणे बंधनकारक आहे आणि त्याशिवाय ट्रस्ट चालू शकत नाही, असेही खातू यांनी शेवटी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world