
शरद सातपुते, सांगली
कोल्हापुरातील माधुरी हत्तीवरून वादंग सुरु असताना सांगलीतील एका हत्तीणीचा वाद समोर आला आहे . सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील प्रसिद्ध गणपती पंचायतन संस्थानच्या 'गौरी' हत्तीणीवरून एक मोठा वाद समोर आला आहे. संस्थेच्या विश्वस्तांनी 'वनतारा' संस्थेवर गंभीर आरोप केले आहेत. गौरी हत्तीणीला 'अनफिट' ठरवून तिच्या बदल्यात दोन ते तीन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी केला आहे.
विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कथित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने गौरी हत्तीणीला अनफिट असल्याचे प्रमाणपत्र देण्याची तयारी दाखवली होती. याच वेळी 'वनतारा' संस्थेच्या माध्यमातून दोन ते तीन कोटी रुपये मिळतील, अशी ऑफरही दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
(नक्की वाचा- Madhuri Elephant: माधुरीसाठी अदृश्य मोर्चा निघणार, नियमही ठरले)
हत्तीणीच्या 'अपहरणा'चा गंभीर आरोप
राजेंद्र पटवर्धन यांनी या प्रकाराला हत्तीच्या 'किडनॅपिंगची' प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. माधुरी हत्तीच्या प्रकरणानंतर तासगावकरांनी आता आपल्या लाडक्या गजलक्ष्मी उर्फ गौरीच्या संरक्षणासाठी कंबर कसली आहे. गौरीच्या संरक्षणासाठी येत्या संकष्टी चतुर्थीपासून सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पटवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.
(नक्की वाचा- Kolhapur News : महादेवी हत्तीणीच्या निरोपासाठी अख्खं गाव आलं एकत्र, गावकऱ्यांचा संताप; मिरवणुकीच्या शेवटी दगडफेक)
तासगाव गणपती पंचायतन संस्थान गेल्या 40 वर्षांपासून गौरी हत्तीणीची काळजी घेत आहे. पुढील काळातही तिची देखभाल योग्य पद्धतीने होत राहील, असा विश्वास विश्वस्तांनी व्यक्त केला आहे. मात्र, 'वनतारा'बद्दल करण्यात आलेल्या या दाव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणावर 'वनतारा'कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world