विशाल पाटील, मुंबई
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत वाद आता टोकाला पोहोचला आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी आखलेल्या रणनीतीमुळे शिवसेनेचा (शिंदे गट) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपची सत्ता आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी थेट राजीनाम्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी राजीनामा देण्यापर्यंतची भाषा मंत्र्यांनी वापरली आहे.
वादाचे मुख्य कारण काय?
सातारा जिल्हा परिषदेत भाजपचे केवळ 27 सदस्य असतानाही, त्यांनी 33 चा आकडा गाठून सत्ता स्थापन केली. यात शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना आपल्या बाजूला वळवण्यात भाजपला यश आले. मतदानाच्या दिवशी झालेल्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली होती. आपल्याच युतीतील पक्षाकडून (भाजप) अशा प्रकारे वागणूक मिळत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. "जिल्ह्यात आमची ताकद असतानाही भाजप आम्हाला डावलून राजकारण करत आहे," अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
(नक्की वाचा - Satara News: मोठी बातमी! सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश; झेडपी निवडणुकीचा राडा भोवला)
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून योग्य कारवाई झाली नाही तर आम्ही राजीनामा देऊ, अशी भूमिका शिवसेना आमदारांना एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. सातत्याने आमची गळचेपी होत आहे यावर बोललं पाहिजे, अशी मागणी देखील शिवसेना आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांचे 'ॲक्शन' मोडमध्ये आदेश
शिवसेना मंत्र्यांची नाराजी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना साताऱ्यातील या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश शिंदेंनी आपल्या मंत्री आणि आमदारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या संपूर्ण वादावर पडदा टाकण्यासाठी भाजपचे जेष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात दाखल झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करत आहेत. सातारा प्रकरण समन्वयाने सोडवण्यासाठी बावनकुळे यांची शिष्टाई कामी येणार का हे पाहावे लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world