अमजद खान, कल्याण
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 70 हून अधिक नागरिक यामध्ये जखमी झाले आहेत. या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईला सुरुवात केली आहे. "कल्याण-डोंबिवली 90 टक्के मोठे होर्डिंग बेकायदा आहेत. या बेकायदा होर्डिंग्सविरोधात केडीएमसी कारवाई करत नाही. महापालिकेचे अधिकारी केबीनमध्ये बसून राहतात. होर्डिंग्स लावताना निकष पाहिले जात नाहीत, असा आरोप शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी केला आहे.
अधिकृत होर्डिंग्स लावणाऱ्या मालकांची बैठक घेतली आहे. बेकायदा होर्डिंग्सच्या विरोधात कारवाई सुरु असल्याचे केडीएमसी उपायुक्तानी सांगितले आहे. शहराचे विद्रुपीकरण या बेकायदा होर्डिंगमुळे होते. त्यामुळे आता तरी महापालिकेने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
(नक्की वाचा- घाटकोपर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत मृतांचा आकडा वाढला; 14 जणांचा मृत्यूला कोण जबाबदार?)
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यानंतर बेकायदा होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मुंबईतच नाही तर मुंबई उपनगरातील महापालिका क्षेत्रातही बेकायदा हर्डिंगचा प्रश्न कायम आहे. कल्याण डोंबिवली शहरात 90 टक्के होर्डिंग्स हे बेकायदेशीर आहेत, असा आरोप शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी केला आहे. पाटील यांनी सांगितले की, कालची मुंबईतील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यात अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. अशी घटना कुठेही घडू नये त्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेने बेकायदा होर्डिंग्सवर तातडीने कारवाई केली पाहिजे.
महापालिका आयुक्त सक्षम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या हाताखालचे अधिकारी हे फक्त एसी केबीनमध्ये बसून काम करतात. रस्त्यावर उतरुन काम करत नाही. नगरविकास खात्याने होर्डिंग्सची नियमावली 2022 साली बनवली होती. त्याचे पूर्णपणे उल्लंघन करुन अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग्स लागलेले आहेत. मुंबईत जे घडले ते कल्याण डोंबिवलीत घडू नये, असं रवी पाटील यांनी म्हटलं.
नक्की वाचा - घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
याबाबत केडीएमसीचे उपायुक्त धैर्यशील जाधव म्हटलं की, महापालिका हद्दीतील अधिकृत होर्डिंग धारकाची एक बैठक आयुक्तांनी नुकतीच घेतली आहे. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आणि त्याच्या सुरक्षिततेचा उपाययोजना करणे याच्या सूचना होर्डिंग धारकाना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बेकायदा होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहे. त्यानुसार बेकायदा होर्डिंग काढण्याची कारवाई केली जाणार आहे, असं जाधव यांनी सांगितलं.