Kalyan News: "...यांचे नेते घराबाहेरच पडत नाहीत"; श्रीकांत शिंदेंची राज-उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Kalyan Dombivli Elections: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. कल्याण पूर्व परिसरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य रोड शो काढण्यात आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण-डोंबिवली

कल्याणमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुतीचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण पूर्वेत भव्य रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करत त्यांना "मैदानात न उतरणारे नेते" असा खोचक टोला लगावला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. कल्याण पूर्व परिसरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य रोड शो काढण्यात आला. या माध्यमातून महायुतीने मोठे शक्तिप्रदर्शन करत विरोधकांना आव्हान दिले आहे.

कल्याण पूर्वेत भगवे वादळ

या रोड शोमध्ये कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची उधळण करत श्रीकांत शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. "लोकांचा प्रतिसाद पाहून हे स्पष्ट आहे की महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. यंदा महायुतीचाच झेंडा फडकणार," असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

ठाकरे बंधूंना खोचक टोला

राज ठाकरे यांच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर भाष्य करताना श्रीकांत शिंदे यांनी त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या, पण सोबतच एक टोलाही लगावला. "नेत्यांनी उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते. मात्र, यांचे नेते (उद्धव आणि राज ठाकरे) प्रत्यक्ष मैदानात किंवा घराच्या बाहेर पडताना दिसत नाहीत. जेव्हा नेता मैदानात असतो, तेव्हाच उमेदवार पूर्ण ताकतीने लढतो," अशी टीका त्यांनी केली. राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांनी अर्ज का मागे घेतले, याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Advertisement

विकासाच्या मुद्द्यावर भर

महायुतीने गेल्या काही वर्षांत केलेल्या कामांची पावती जनता या निवडणुकीत देईल, असे नमूद करत त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या योजनांचा पाढा वाचला. लाडकी बहीण योजनेपासून ते रस्ते विकासापर्यंतच्या मुद्द्यांवर महायुती ही निवडणूक लढवत असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.