आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. आज इंग्रजीचा पहिला पेपर आहे. यातच मराठवाड्यातील बीड जिल्हा वादात सापडला आहे. बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील एका महाविद्यालयात आज बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षेच्या दाव्यांची पोलखोल झाली.
इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांनी थेट परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार शिक्षण विभागाने तैनात केलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आज सकाळी बारावीच्या इंग्रजी भाषेच्या परीक्षेला सुरुवात होताच काही वेळातच परीक्षा केंद्राच्या आवारात असामान्य हालचाली सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना बाहेरून उत्तरे, चिठ्ठ्या आणि मार्गदर्शन देण्यासाठी पालक मोठ्या संख्येने महाविद्यालयाच्या भिंतीलगत जमा झाले होते. काही पालकांनी तर थेट खिडक्या, भिंती चढून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आले आहे. राज्यभरात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवले जात असताना बीड जिल्ह्यातील हा प्रकार प्रशासनासाठी नामुष्कीचा ठरला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world