जाहिरात

Dombivli : सरकारी नोकरभरतीचा खेळखंडोबा; SSC च्या परीक्षांमध्ये मोठा गोंधळ, डोंबिवलीचे शेकडो विद्यार्थी त्रस्त

Staff selection commission exam : दुसऱ्या सत्रात सर्व्हर डाऊन झाल्याने 178 विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. सुमारे 3 तास गोंधळ सुरू राहिल्याने अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. 

Dombivli : सरकारी नोकरभरतीचा खेळखंडोबा;  SSC च्या परीक्षांमध्ये मोठा गोंधळ, डोंबिवलीचे शेकडो विद्यार्थी त्रस्त
Staff selection commission exam : डोंबिवलीत फ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या परीक्षांमध्ये गोंधळ झाला.
डोंबिवली:

Staff selection commission exam : सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये नियोजन आणि तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या परीक्षांमध्ये त्याच पद्धतीची घटना घडल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

वाहतूक कोंडीमुळे KDMC ची परीक्षा हुकली

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 490 पदांसाठी 09 ते 12 सप्टेंबर दरम्यान 14 जिल्ह्यांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 09 सप्टेंबर रोजी मुंबईतील पवई येथे असलेल्या परीक्षा केंद्रावर वाहतूक कोंडीमुळे 150 हून अधिक विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता आले नाही. केवळ काही सेकंदांच्या विलंबाने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांची परीक्षा हुकली. 

यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा परीक्षेची संधी मिळावी अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. सध्या हे विद्यार्थी रोज महापालिका मुख्यालयासमोर येऊन प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. मात्र, अद्याप महापालिकेने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

( नक्की वाचा : KDMC Exam : नोकरभरतीसाठी आलेल्या 150 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात, पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी )
 

SSC च्या परीक्षेत सर्व्हर डाऊन

दुसरीकडे, डोंबिवली येथील सुरेखा इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर स्टाफ सिलेक्शन कमिशनची (SSC) ऑनलाइन परीक्षा सुरू असताना मोठा गोंधळ उडाला. शुक्रवारी दुपारी सुरू असलेल्या दुसऱ्या सत्रात सर्व्हर डाऊन झाल्याने 178 विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. सुमारे 3 तास गोंधळ सुरू राहिल्याने अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. 

या घटनेमुळे देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल असे आश्वासन देण्यात आले असले तरी, नेमकी कधी घेतली जाईल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

या दोन्ही घटनांमुळे सरकारी नोकरीच्या परीक्षांच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रशासनाने गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे समोर आले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com