
सुजाता द्विवेदी, प्रतिनिधी
महाराष्ट्र एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून नाजूक आहे. अशा परिस्थितीत, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांमुळे एक महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे.
इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम यांसारख्या सरकारी तेल कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवल्या जाणाऱ्या डिझेलवर आता अतिरिक्त सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या सवलतीत कोणताही बदल झाला नव्हता, परंतु यावेळी कंपन्यांनी प्रति लिटर 30 पैशांची अतिरिक्त सवलत देण्यास सहमती दर्शवली आहे.
( नक्की वाचा : Ganeshotsav 2025: मुंबईकरांनो, कोकणात गणपतीला ST नेच जा! 30% भाडेवाढीचा 'तो' निर्णय रद्द )
ही सवलत 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल. एसटी महामंडळ दररोज सुमारे 10.77 लाख लिटर डिझेल खरेदी करते. त्यामुळे, या नवीन सवलतीमुळे दररोज 3.23 लाख रुपये आणि वर्षभरात सुमारे 11.80 कोटी रुपयांची बचत होईल.
एसटी महामंडळ इंधनाचा खर्च, देखभाल आणि इतर प्रचंड खर्चांशी झगडत असताना हा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सवलतीच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता, परंतु यंदा
खाजगी कंपन्यांना निविदा प्रक्रियेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यामुळे स्पर्धा वाढली आणि तेल कंपन्यांना अतिरिक्त सवलत देण्यास भाग पाडले.
( नक्की वाचा : Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो विसरा! थेट राज्य सरकारच सुरु करणार खास सेवा! वाचा सर्व माहिती )
मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, एसटीची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, प्रत्येक स्तरावर खर्च कपात करणे आणि पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधणे अनिवार्य झाले आहे.ते म्हणाले, "बचतीचे प्रत्येक छोटे पाऊल एसटीला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप असू शकते."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world