मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon Crime News Today : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या मामलदे शिवारात अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रात्री आईच्या कुशीत झोपलेल्या अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकलीला हिंस्र प्राण्याने उचलून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी आईच्या कुशीत चिमुकली नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शेत परिसरात शोधाशोध केली. त्यानंतर काही अंतरावर तिचे हाडामासाचे अवशेष आढळून आले.
ही घटना काठेवाडी गायींसह फिरणाऱ्या राजस्थानी कुटुंबात घडली. हे कुटुंब मामलदे शिवारातील एका शेतात मुक्कामी थांबले होते. रात्रीच्या सुमारास आई आपल्या दोन महिन्याच्या बालिकेला कुशीत घेऊन खाटेवर झोपली होती. मात्र पहाटेच्या वेळी बाळ दिसत नसल्याने आईने आरडाओरडा करत कुटुंबीयांना जागे करत चिमुरडीचा शोध सुरू केला. त्यानंतर काही अंतरावर बाळाचे अवशेष आढळून आल्याने अज्ञात हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचा संशय अधिक बळावला.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यातील 'या' भागातील घरांवर चोरट्यांची नजर, उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी टाळा तोडला अन्..
फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पंचनामा केला अन्..
घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पथक,महसूल प्रशासन, वैद्यकीय अधिकारी तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून नमुने तपासणीसाठी पाठवले असून नेमका कोणत्या प्राण्याने हल्ला केला,याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून सखोल तपास केला जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी दिली आहे.
नक्की वाचा >> Ashok Kharat: खरातचा नवा कारनामा उघड, सोन्याऐवजी दिल्या पितळी अन् पुष्कराज अंगठ्या, उद्योगपतीची SIT कडे धाव
"नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर झोपू नये"
दरम्यान वन विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली असून वनविभागाच्या वतीने देखील अज्ञात हिंस्त्र प्राण्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये अज्ञात हिंस्र प्राण्याची दहशत निर्माण झाली असून शेत शिवार किंवा रानावनात नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर झोपणे टाळावे. विशेष करून लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या घटनेमुळे राजस्थानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अवघ्या दोन महिन्याच्या चिमुरडीचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने सर्वच सुन्न झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world