बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसिना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देशातून काढता पाय घेत भारतात आश्रय घेतला. या घडामोडीनंतर दिल्लीमध्ये सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बांगलादेशासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, शेजारच्या देशातील या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने सूचक पद्धतीने श्रीलंकेनंतर बांगलादेशमध्ये जे घडत आहे तो भारतातील सत्ताधाऱ्यांना इशारा असल्याचं म्हटलं आहे.
शांतता वादळापूर्वीचीच ठरली
आपल्या शेजारच्या आणखी एका देशात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देशातील प्रचंड हिंसाचारामुळे राजीनामा देणे तर भाग पडलेच, शिवाय बहिणीसह देश सोडण्याचीही वेळ आली. सरकारी नोकरीतील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीवरून गेल्या महिन्यात सुरू झालेल्या उग्र आंदोलनाचा शेवट अखेर हसीना यांनी पंतप्रधानपद सोडून देशाबाहेर पलायन करण्यात झाला. जुलै महिन्यात या आंदोलनात सुमारे 100 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला. मधल्या काळात हा वाद शांत होईल असे चित्र निर्माण झाले होते, परंतु ही तात्पुरती शांतता वादळापूर्वीचीच ठरली, असं ठाकरे गटाने बांगलादेशमधील घडामोडींवर भाष्य करताना म्हटलं आहे.
'हसीनाराज' संपुष्टात
दोन-तीन दिवसांपूर्वी आंदोलनाचे वादळ पुन्हा घोंघावले आणि त्यात हसिना यांचे सरकार उडून गेले. सरकारी नोकरीतील आरक्षण रद्द करण्यावरून सुरू झालेले आंदोलन शेख हसिना यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचले. राजधानी ढाक्यासह अनेक शहरांमध्ये हिंसाचाराच्या लाटा उसळल्या. सरकारने देशभर कर्फ्यू लागू केला. सोशल मीडियावर बंदी घातली. 14 पोलिसांसह 100 पेक्षा जास्त आंदोलकांचा बळी गेला. तरीही आंदोलन दडपले गेले नाही. हसिना यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची संख्या चार लाखांवर गेली. टांगेल आणि ढाका येथील महामार्ग तर आंदोलकांनी ताब्यात घेतलेच, परंतु हसिना यांच्या निवासस्थानापर्यंत धडक दिली. अखेर शेख हसिना यांना त्यांच्या बहिणीसह देशातून काढता पाय घेणे भाग पडले. मागील 15-16 वर्षांपासून बांगलादेशात असलेले ‘हसीनाराज' अशा पद्धतीने संपुष्टात आले," अशी टीप्पणी 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
शेख हसीना यांच्या आयुष्यातील सर्वात खडतर 45 मिनिटं, वाचा सत्ता सोडण्यापूर्वी नेमकं काय झालं?
महागाई आणि बेरोजगारी
मुळात 2024 च्या सुरुवातीला त्यांची पंतप्रधानपदी झालेली निवडही वादाच्या आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. या मतदान प्रक्रियेवरच विरोधक आणि टीकाकारांनी आक्षेप घेतले होते. माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी' या प्रमुख विरोधी पक्षानेही या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. मात्र हुकूमशाही पद्धतीने शेख हसिना यांचा राज्यकारभार सुरूच होता. त्यात अलीकडील काळात तेथे महागाई आणि बेरोजगारी या समस्यांनी थैमान घातले होते. तेथे भडकलेल्या आंदोलनाचे एक कारण हेदेखील होते," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
श्रीलंकेची आठवण करुन दिली
सामान्य जनतेची रोजीरोटी हाच कुठल्याही सरकारसाठी सर्वाधिक जिव्हाळ्याचा मुद्दा हवा, मात्र त्याचा विसर जेव्हा राज्यकर्त्यांना पडतो किंवा ‘भूलथापा' देऊन ते केवळ जुमलेबाजीच्या जोरावर राज्य करू लागतात तेव्हा जनआंदोलनाचे वादळ घोंघावतेच आणि त्या वादळात ती राजवट पालापाचोळ्यासारखी उडून जाते. शेजारच्या श्रीलंकेत दोन वर्षांपूर्वी हेच घडले होते. प्रचंड महागाई, भीषण अन्नटंचाई आणि आर्थिक अरिष्टाच्या चरकात पिळला गेलेला तेथील सामान्य नागरिक रस्त्यावर उतरला होता. राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांच्यासह अनेक सत्ताधारी खासदारांची घरे, कार्यालये आंदोलकांनी पेटवून दिली होती. आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनाही जनआंदोलनाची धग बसली आहे," असं म्हणताना ठाकरे गटाने पुढे भारतासंदर्भात सूचक विधानं केली आहेत.
‘नरेटिव्ह' आपल्या देशातील भक्त मंडळी येता-जाता सांगत पण...
भारताशेजारच्या राष्ट्रांमधील उलथापालथींमागे चीन आणि अमेरिकेचा हात आहे, असे ‘नरेटिव्ह' आपल्या देशातील भक्त मंडळी येता-जाता सांगत असते, परंतु त्या देशामधील आर्थिक, सामाजिक, राजकीय अराजक, त्यासाठी कारणीभूत ठरलेले तेथील राज्यकर्ते आणि भरडल्या गेलेल्या जनतेचा या राजवटींविरोधात उफाळलेल्या वणव्याचे काय? चीनकडे बोट दाखविण्याची जुमलेबाजी करून हे वास्तव कसे झाकता येईल? बांगलादेशची सध्याची स्थिती यापेक्षा वेगळी कुठे होती?" असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
भारतातील जुमलेबाज आणि हुकूमशाही राज्यकर्त्यांच्या...
"बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची हुकूमशाही, विरोधकांना तुरुंगात डांबणे, विद्यार्थी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे या सगळ्याचा कडेलोट जनक्षोभाच्या रूपात होणार होता. हा क्षोभ एवढा झाला की, शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबूर रेहमान यांचे योगदानही संतप्त जनता विसरली. ‘लढाऊ बेगम' म्हटल्या जाणाऱ्या शेख हसीना यांना पलायन करावे लागले. लष्करी राजवटीपासून देशाची मुक्ती करणाऱ्या हसीना यांना त्याच लष्कराच्या हेलिकॉप्टरचा सहारा घ्यावा लागला. सर्वच हुकूमशहांसाठी हा इशारा आहे. दोन महिन्यांपूर्वी लोकशाही मार्गाच्या रेट्याने सत्तेबाहेर जाता जाता थोडक्यात बचावलेल्या भारतातील जुमलेबाज आणि हुकूमशाही राज्यकर्त्यांच्या लक्षात काही येत आहे का?" असा सवाल लेखाच्या शेवटी विचारण्यात आला आहे. तर लेखाचा शेवट, "समझनेवालों को इशारा काफी है!" असं म्हणत करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world