जाहिरात

Thane News: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात पुढील 48 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Thane Water Cut: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंगळवार, दिनांक 23 जून 2026 रोजी रात्री 12 वाजेपासून ते गुरुवार, दिनांक 25 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 48 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

Thane News: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात पुढील 48 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Thane Water Cut News: ठाण्यातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक भागांमधील पाणीपुरवठा पुढील 48 तासांसाठी पूर्णपणे ठप्प राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने अधिकृत परिपत्रक जारी करून नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.

पाणी कपातीचे नेमके कारण काय?

यंदा 'अल निनो' आणि 'आयओडी' च्या जागतिक हवामान प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी काळात ठाणे शहरात पाण्याचे भीषण संकट किंवा पाणीटंचाई निर्माण होऊ नये, म्हणून जलसंपदा विभागासोबत 19 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत पाणी कपातीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 

(नक्की वाचा-  Nashik MLC Election: नाशकात सर्वात मोठा उलटफेर! गोकुळ गितेंचा 'गनिमी कावा'; नरेंद्र दराडेंचा पराभव करत विजयी)

कधी बंद असेल पाणीपुरवठा?

या निर्णयानुसार, मंगळवार, 23 जून रोजी रात्री 12 वाजल्यापासून गुरुवार, 25 जून  रोजी रात्री 12 वाजेपर्यंत MIDC बारवी, जांभूळ आणि शहाड जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल.

'या' भागांमध्ये 48 तास पाणी नसेल

  • दिवा प्रभाग समिती: सर्व भाग.
  • कळवा प्रभाग समिती: सर्व भाग.
  • मुंब्रा प्रभाग समिती: प्रभाग क्रमांक 26 आणि 31 चा काही भाग वगळता संपूर्ण मुंब्रा परिसर.
  • वागळे प्रभाग समिती: रुपादेवी पाडा, किसननगर नंबर 2 आणि नेहरूनगर.
  • माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती: कोलशेत खालचा गाव.

(नक्की वाचा-  ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाकरे गटातून बाहेर पडताच या अधिकाऱ्याच्या बदलीची केली मागणी)

पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

ठाणे पालिकेने नागरिकांना सतर्क करताना सांगितले आहे की, गुरुवार रात्री 12 वाजता शटडाऊन संपल्यानंतर जेव्हा पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल, तेव्हा पुढील 1 ते 2 दिवस पाणी अत्यंत कमी दाबाने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व ठाणेकर नागरिकांनी या 48 तासांच्या पाणी कपातीच्या कालावधीत उपलब्ध पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असं आवाहन करण्यात आले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com