जाहिरात

Thane Metro : ठाणे मेट्रोचं स्वप्न साकार! 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ट्रायल रन, 10 स्टेशन निश्चित

Thane Metro Trial Run : ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच सुरु होतीय. त्यासाठी ट्रायल सोमवारी म्हणजेच 22 स्पटेंबर रोजी होणार आहे. पण, हा प्रवास सोपा नव्हता.

Thane Metro : ठाणे मेट्रोचं स्वप्न साकार! 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ट्रायल रन, 10 स्टेशन निश्चित
Thane Metro Trial Run : ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मेट्रो रेल्वे हा उपाय ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई:

Thane Metro Trial Run : मुंबईच्या सावलीतील शांत तसंच टुमदार शहर ही ठाण्याची ओळख केव्हाच मागं पडलीय. ठाणे हे आता राज्यातील झपाट्यानं वाढलेलं शहर बनलंय. ठाण्याची लोकसंख्या गेल्या काही दशकांमध्ये झपाट्यानं वाढली. त्यामुळे साहजिकच रस्त्यांवर वाहनांचं प्रमाणही अनेक पटीनं वाढलं. मर्यादीत रस्ते आणि रोज वाढणारी वाहनं यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना सातत्यानं करावा लागलाय. विशेषत: घोडबंद रोड भागात राहणाऱ्या ठाणेकरांचे रोजचे कित्येक तास या वाहतूक कोंडीत जातात. या सर्वांमधून लवकरच ठाणेकरांची सुटका होणार आहे. 

ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच सुरु होतीय. त्यासाठी ट्रायल सोमवारी म्हणजेच 22 स्पटेंबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री  ठाणे मेट्रोच्या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 

ठाणे मेट्रोची शहरात 10 स्टेशन आहेत. त्यामुळे ठाणेकरांना शहरातील वेगवेगळ्या भागातून य स्टेशनवर जाऊन मेट्रो पकडता येईल आणि त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. 

( नक्की वाचा : Thane Metro : ठाण्यात सोमवारी मेट्रो धावणार! 'या' 10 स्टेशनवरून ट्रायल रन, वाचा सर्व माहिती एका क्लिकमध्ये )
 

20 वर्षांचा संघर्ष

ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. पण, हा प्रवास सोपा नव्हता. राज्यातील मुंबई तसंच पुणे या शहरांना मेट्रोला परवानगी मिळाली होती. त्याचवेळी ठाण्यातही मेट्रो सुरु व्हावी अशी तत्कालीन शहरातील आमदारांची इच्छा होती. पण, त्यावेळी तसं झालं नाही. 

"20 वर्षांपूर्वी आम्ही ठाण्यासाठी मेट्रोची मागणी करत आंदोलन केले होते.' त्यावेळी आम्हाला सभागृहातून निलंबितही व्हावे लागले होते, अशी आठवण उपमुख्यमंत्री आणि ठाणे शहरातील आमदार एकनाथ शिंदे यांनी सांगितली. 

“मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक वर्षांपासून ठाण्यासाठी मेट्रोची मागणी लावून धरली होती. पूर्वीच्या सरकारने 'ठाण्यात मेट्रो व्यवहार्य होणार नाही' असे सांगितले होते, तेव्हा आम्ही 'पुणे-मुंबई तुपाशी तर ठाणे का उपाशी?' असा सवाल विचारला होता,'' असं ठाण्यातील आणखी एक आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निमित्तानं सांगितलं.

( नक्की वाचा : Beed News: प्रतीक्षा संपली! 40 रुपयांत बीडहून अहिल्यानगरला रेल्वेने जा; किती स्टेशन असणार? वाचा सर्व माहिती )
 

कधी मिळाली गती?

राज्यात 2014 साली भाजपा-शिवसेना युतीचं सरकार सत्तेवर आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबईतील मेट्रो मार्गाचा विस्तार प्राधान्यक्रमानं झाला. त्याचवेळी त्यांनी ठाणे मेट्रोच्या प्रकल्पालाही मंजुरी दिली. ठाण्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनीही या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. त्यामुळे या ठाणे मेट्रोच्या प्रकल्पाला गती मिळाली.

ठाणे मेट्रोची स्टेशन कोणती?

ठाण्यातील 10 ठिकाणांहून ही मेट्रो धावणार आहे. ती स्टेशन खालीलप्रमाणे

1) कॅडबरी 
2) माजीवाडा 
3) कपूरबावाडी 
4) मानपाडा 
5) टिकूजी -नी -वाडी 
6) डोंगरी पाडा 
7) विजय गार्डन 
8) कासरवाडावली, 
9) गव्हाणपाडा
10) गायमुख

ठाण्यातील मेट्रो ही मेट्रो 4 A अंतर्गत येते. हा एकूण 32 किलोमीटरचा मार्ग आहे. या दोन्ही मार्गिंकांवर मिळून 32 स्टेशन असणार आहेत. तीन टप्प्यात विभागलेला वडाळा ते कासारवडवलीपर्यंत विस्तारित मार्ग जवळपास 80 टक्क्यांपेक्षा पूर्ण झाला आहे. कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला भाग डिसेंबर 2025 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ठाणेकरांचं मेट्रोनं प्रवास करण्याचं स्वप्न या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com