
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर प्रियकराने प्रेयसीचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून आपल्या मित्राच्या मदतीने बाईकवरून 100 किलोमीटर दूर नेला आणि नदीत फेकून दिला. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह फेकण्यापूर्वी त्याने तिच्या मृतदेहासोबत सेल्फी काढला. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राला अटक केल्यानंतर ही क्रूर घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा ही मूळची कानपूर देहातची असून, ती बर्रा येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. आरोपी सूरजही त्याच रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. इंस्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली. सूरजने सांगितले म्हणून आकांक्षाने जुनी नोकरी सोडून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये काम सुरू केले. तसेच, ती तिच्या मोठ्या बहिणीपासून वेगळी होऊन सूरजसोबत हनुमंत विहारमध्ये एका भाड्याच्या घरात लिव्ह-इनमध्ये राहू लागली.
(नक्की वाचा- Kalyan News: कल्याणमध्ये नशेखोरांचा हैदोस! खात्री पटल्याशिवाय लोक उघडत नाहीत दार)
21 जुलै रोजी सूरजला आकांक्षाचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. रात्री 10:30 च्या सुमारास ते दोघे खोलीत परतल्यावर त्यांच्यात जोरदार भांडण झाले. या भांडणात हाणामारी झाली आणि सूरजने आकांक्षाचा गळा दाबून तिचा जीव घेतला.
मृतदेह फेकून देण्याचा कट
हत्या केल्यानंतर आरोपी सूरजने आपला मित्र आशिषला बोलावले. दोघांनी मिळून आकांक्षाचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरला. त्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास बाईकवरून सूटकेस घेऊन ते बांदा जिल्ह्यातील चिल्ला पुलावरून यमुना नदीत मृतदेह फेकून आले.
(नक्की वाचा- Kolhapur Crime: प्रेमविवाहाला मदत केल्याचा राग.. दांपत्यावर कोयत्याने वार; बोटे तुटून पडली, कोल्हापुरात खळबळ)
सुरुवातीला सूरज पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. पण जेव्हा पोलिसांनी घटनेच्या दिवशी आकांक्षासोबत त्याचे लोकेशन आणि मोबाईलवरील चॅटबद्दल विचारले, तेव्हा तो घाबरला आणि त्याने गुन्हा कबूल केला. दक्षिण डीसीपी दीपेंद्र नाथ चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सूरजच्या मोबाईलमधून मृतदेह फेकण्यापूर्वी काढलेला सेल्फीही जप्त केला आहे.
सध्या पोलिसांनी सूरज उत्तम आणि मृतदेह फेकण्यात मदत करणारा त्याचा मित्र आशिष या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शोधण्याचे काम अजूनही सुरू आहे, पण तो अद्याप सापडलेला नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world