जाहिरात

Thane News: झोमॅटो डिलिव्हरी बॉय निघाला ड्रग्स तस्कर, 3.97 कोटींच्या एमडी ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पोलिसांनी तात्काळ हे 3 कोटी 4 लाख 71 हजार रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आणि डिलिव्हरी बॉय इरफान अमानूल्लाह शेख याला अटक केली. त्याच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Thane News: झोमॅटो डिलिव्हरी बॉय निघाला ड्रग्स तस्कर, 3.97 कोटींच्या एमडी ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

रिझवान शेख, ठाणे

Thane Crime News : ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि युनिट एकच्या पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या मोठ्या कारवायांमधून तब्बल 3 कोटी 97 लाख रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या इरफान अमानूल्लाह शेख आणि शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डायघर परिसरात डिलिव्हरी बॉयच्या वेशात ड्रग्ज तस्करी

ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाला एक व्यक्ती एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी डायघर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, 27 जुलै रोजी सायंकाळी शीळफाट्याकडून दिवागावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस पथकाने सापळा रचला. यावेळी एका फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे 1 किलो 522 ग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रोन हे ड्रग्ज आढळून आले.

(नक्की वाचा- Vasai Virar : ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहताच घराचं दार बंद केलं; वसई-विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्या घरावर छापा)

पोलिसांनी तात्काळ हे 3 कोटी 4 लाख 71 हजार रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आणि डिलिव्हरी बॉय इरफान अमानूल्लाह शेख याला अटक केली. त्याच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे ड्रग्ज तस्कर किती वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत हे स्पष्ट होते.

कळवा परिसरात दुसऱ्या तस्कराला अटक

दुसरी मोठी कारवाई ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 जुलै रोजी केली. एक तस्कर भिवंडी-मुंब्रा रस्त्यावर एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट एकच्या पथकास मिळाली होती. या माहितीनुसार, पोलिसांनी भिवंडी-मुंब्रा रस्त्यावर खारेगाव टोल नाक्याजवळ सापळा रचला आणि एका कार चालवणाऱ्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.

(नक्की वाचा - Eknath Khadse : खडसेंचे जावई दर आठवड्याला पार्टी करत होते, पोलीस तपासाचा वाचा Exclusive Report)

त्याच्या कारची झडती घेतली असता, त्यामध्ये 662 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. 92 लाख 68 हजार रुपये किंमत असलेले हे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आणि ड्रग्ज तस्कर शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान (28, मंदसौर, मध्य प्रदेश) याला अटक केली. न्यायालयाने त्याला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही यशस्वी कारवायांनी ठाणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी आघाडी घेतली आहे. शहराला ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे यातून दिसून येते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com