जाहिरात

आश्रम शाळेतील मुले जल पूजनासाठी इंद्रायणीवर गेली, तिघे बुडाले; दोघांचा मृत्यू

या दुर्घटनेमुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या मुलांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या का ? निवासी गुरुकुलातील मुलांना नदी काठावर जल पूजनासाठी नेणे आवश्यक होते का ? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

आश्रम शाळेतील मुले जल पूजनासाठी इंद्रायणीवर गेली, तिघे बुडाले; दोघांचा मृत्यू
पिंपरी:

पिंपरीजवळ मोशी इथे एका आश्रम शाळेतील तीन विद्यार्थी इंद्रायणी नदीत बुडाले आहेत. ही मुले बुडाल्यानंतर त्यांना शोधून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावण्यात आले होते. यासोबतच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमलाही बोलावण्यात आले होते. अग्निशमन दलाचे जवान आणि या रेस्क्यू टीमने तीनपैकी दोघांना बाहेर काढले आहे. या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. जय दायमा आणि ओमकार पाठक अशी या मुलांची नावे आहेत. इंद्रायणी नदीकाठी ही मुले जल पूजनासाठी गेली होती असे कळते आहे. 

मोशी-आळंदी रस्त्यावर असलेल्या वेदश्री तपोवन या निवासी गुरुकुल संस्थेतील 50 ते 60 मुले इंद्रायणी नदीच्या काठी जल पूजनासाठी गेली होती. मोशीतील तापकीर नगर इथे हा कार्यक्रम निवासी शाळेतर्फे आयोजित करण्यात आला होता असे सांगितले जात आहे. जल पूजन करत असताना एका मुलाचा पाय घसरला आणि तो नदीत पडला होता. तो बुडताना पाहून त्याच्या दोन मित्रांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही जण पाण्यात बुडाले. 

अग्निशमन दल आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी बुडालेल्या तिघांपैकी दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहे. तिसऱ्या मुलाचा शोध घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मात्र या दुर्घटनेमुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या मुलांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या का ? निवासी गुरुकुलातील मुलांना नदी काठावर जल पूजनासाठी नेणे आवश्यक होते का ? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. या दुर्घटनेनंतर  गुरुकुलाची चौकशी केली जावी अशी मागणी केली जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या साक्षीदाराचा VIDEO आला समोर; गोळीबारानंतर नेमकं काय घडलं? पाहा
आश्रम शाळेतील मुले जल पूजनासाठी इंद्रायणीवर गेली, तिघे बुडाले; दोघांचा मृत्यू
electrical equipment fell from the sky in Yeola area of ​​Nashik
Next Article
Nashik News : मोठा आवाज, लाल रंगाचा प्रकाश... आकाशातून पडलेल्या उपकरणाची येवला परिसरात चर्चा