अमजद खान, प्रतिनिधी
दंडात्मक कारवाई किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास त्यापासून वाचण्यासाठी डिलिवरी बॉय धोकादायक शक्कल लढवित आहेत. ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममधील बाईकस्वारांचं कृत्य कल्याणमधील एका तरुणाने व्हिडिओ करीत उघडकीस आणलं आहे. दुचाकीवरील नंबर प्लेटवर स्टीकर लावून फिरणाऱ्या डिलिवरी बॉयची गाडी थांबवून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. निलेश जगदाळे यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. स्थानिक तरुण वाहतूक पोलिसांचं काम करत असेल तर वाहतूक विभाग काय करतंय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी वाहतूक विभागाच्या पोलिसांकडून लवकर कारवाई करण्यात येणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण पश्चिमेत राहणारे निलेश जगदाळे एक इंटेरिअर डिझायनर आहेत. काही डिलिवरी बॉय त्यांच्या गाड्यांच्या नंबर प्लेटवर स्टीकर लावून फिरत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं. म्हणजे चार आकडी नंबर ऐवजी एका आकड्यावर स्टीकर चिटकवला जातो.
नक्की वाचा - Crime News: 'कचऱ्याच्या कंत्राट'चा वाद, बेछुट गोळीबार, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक अटकेत
काही दिवसांपूर्वी खडकपाडा सर्कलवर निलेशने असाच एक प्रकार उघडकीस आणला होता. यावेळी त्यांनी डिलिवरी बॉयला ताकीद देऊन सोडलं. १२ जानेवारीच्या रात्री निलेश जगदाळे यांच्यासोबत भूषण भिसे श्रीपाद देसले, आणि योगेश राऊत हे तरुण होते. त्यांना पुन्हा स्टिकर लावलेल्या दुचाकी दिसल्या. यातील अनेकांना आधीही पकडलं होतं. मात्र त्यानंतरही ते स्टिकर लावून दुचाकी चालवित होते. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडून लवकरच याबाबत कारवाई करण्यात येणार आहे.
नक्की वाचा - Crime news: दिवसाढवळ्या बंदूक घेत दुकानात घुसले, धडाधड गोळ्या झाडल्या, थरकाप उडवणारा Video
वाहतूक नियमांचे खुलेआम उल्लंघन होत आहे. सर्वसामान्य नागरिकांवर ज्या प्रकारे नियम तोडल्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, त्यानुसार ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या डिलिवरी बॉयकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर यातून एखादी अप्रिय घटना घडली. त्यासाठी कोण जबाबदार? या बाबत निलेश यांनी केडीएमसी आयुक्त, पोलीस आयुक्त, वाहतूक विभागाचे अधिकारी आणि आरटीओ यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. मात्र अद्याप ही कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
याबाबत कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी सांगितलं की, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. आमच्या हद्दीत दहा पॉईंट आहेत. सर्व पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. असा प्रकार करणाऱ्या सर्व डिलिवरी बॉय यांच्या गाड्या चेक करुन त्यांच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world