Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका वेगळ्याच आशयाच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संजू तळपदे नावाच्या युजरने "कृपा करून तुम्ही मराठी भाषा शिकू नका" असे आवाहन करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. वरवर पाहता हे विधान नकारात्मक वाटत असले, तरी त्यामागील त्यांचा उद्देश मराठी साहित्याची, कलेची आणि संस्कृतीची थोरवी सांगण्याचा आहे.
नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
संजू तळपदे म्हणतात की, जर तुम्ही मराठी भाषा शिकलात तर तुम्ही पु.ल. देशपांडे, आचार्य अत्रे आणि राम गणेश गडकरी यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांशी जोडले जाल. एकदा का तुम्हाला पु.ल. देशपांडे यांच्या स्टँडअप कॉमेडीची सवय झाली तर आजच्या काळातील स्टँडअप कॉमेडियन्स तुम्हाला फिके वाटू लागतील. तुमची मनोरंजनाची पातळी इतकी उंचावेल की इतर गोष्टींमधील तुमची मजा कमी होईल, म्हणून मराठी शिकू नका, असा उपहासात्मक विधान त्यांनी केलंय.
नाट्यसृष्टी आणि अभिनयाची नशा
मराठी नाटकांच्या दर्जाबद्दल ते म्हणाले की, "मराठी नाटकातील कलाकारांचा अभिनय पाहून तुम्हाला त्याची नशा चढेल. रिअलिस्टिक (वास्तववादी) अभिनय काय असतो, हे तुम्हाला उमजेल आणि मग तुम्हाला इतर भाषेतील अभिनय कृत्रिम वाटू लागेल." जर तुम्हाला खऱ्या अभिनयाची नशा नको असेल, तर मराठीपासून दूर राहा, असे ते मजेशीरपणे सांगतात.
मराठीतील संगीताची श्रीमंती आणि हॉररचा थरार
हिंदी मालिका सोडून तुम्ही मराठी मालिकांकडे वळाल, अशी भीती व्यक्त करतानाच त्यांनी मराठी संगीताचाही उल्लेख केला. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, सुगम संगीत यासह भीमसेन जोशी आणि बालगंधर्वांची गोडी एकदा लागली की तुमची आनंद घेण्याची क्षमता कैक पटीने वाढेल. इतकेच नव्हे तर नारायण धारप यांच्या भयपट कथांनी अंगावर शहारे येण्याचा अनुभव घ्यायचा नसेल, तर मराठी शिकू नका, असेही त्यांनी नमूद केले.
(नक्की वाचा: Viral Video: भिंत आणि लिफ्टच्या मध्ये चिरडला जाणार होता, पण... अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल)
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचाही उल्लेखआजच्या धावपळीच्या युगात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यासारख्या कार्यक्रमांनी अनेकांना हसण्याची सवय लावली आहे. अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हास्यजत्रेचे व्हिडीओ पाहून करतात. जर तुम्हाला दोन-तीन मिनिटांच्या रील्समध्ये समाधान मानायचे असेल आणि मनसोक्त हसायची सवय लावून घ्यायची नसेल तर मराठी भाषा शिकू नका, असे आवाहन तळपदे यांनी या व्हिडीओद्वारे केले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, संजू तळपदे यांनी नकारात्मक टोन वापरून मराठी भाषेतील वैभवाचे अतिशय प्रभावी मार्केटिंग केले आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. दुसरीकडे मराठी भाषिकांसह अमराठी भाषिकही तळपदेंवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world