जाहिरात

Navi Mumbai Politics : नवी मुंबईत राजकीय भूकंप होणार? निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं टेन्शन वाढलं? 

संदीप नाईक हे नवी मुंबईतील एक युवा, गतिमान आणि कर्तृत्ववान नेता म्हणून ओळखले जातात. ऐरोली मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिलेले संदीप नाईक यांनी महापालिकेतील स्थायी समिती सभापती म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Navi Mumbai Politics : नवी मुंबईत राजकीय भूकंप होणार? निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं टेन्शन वाढलं? 

राहुल कांबळे, नवी मुंबई

भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत ऐरोली मतदारसंघातून विद्यमान आमदार गणेश नाईक यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मात्र, चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे बेलापूर मतदारसंघ. जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांचे सुपुत्र आणि बेलापूर मतदारसंघासाठी प्रमुख दावेदार असलेले संदीप नाईक यांचे नाव यादीतून वगळले गेले असून, विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

संदीप नाईकांची 'तुतारी'वर लढण्याची तयारी?

संदीप नाईक यांचे नाव भाजपच्या यादीतून वगळल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, संदीप नाईक हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करून 'तुतारी' चिन्हावर बेलापूरमधून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. संदीप नाईक यांचा कार्यकर्त्यांमध्ये असलेला प्रभाव आणि मतदारसंघातील मजबूत पकड पाहता, त्यांच्या या निर्णयाने बेलापूर तसेच नवी मुंबईत मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो.

(नक्की वाचा-  BJP First List : भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये काय? 99 उमेदवार कोण? वाचा सविस्तर)

संदीप नाईक हे नवी मुंबईतील एक युवा, गतिमान आणि कर्तृत्ववान नेता म्हणून ओळखले जातात. ऐरोली मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिलेले संदीप नाईक यांनी महापालिकेतील स्थायी समिती सभापती म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील तरुण कार्यकर्त्यांची मोठी फौज ही त्यांची खरी ताकद आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतल्यास, मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मतांचा फायदा होऊन, संदीप नाईक यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

(नक्की वाचा-  Santosh Bangar News : शिवसेना आमदार संतोष बांगरांविरोधात गुन्हा दाखल; 'ते' वक्तव्य भोवलं)

बेलापूरमध्ये घडणार मोठा राजकीय बदल?

गेल्या काही महिन्यांपासून बेलापूरमधील राजकीय वातावरण तापलेले आहे. संदीप नाईक यांच्या संभाव्य निर्णयामुळे ही राजकीय लढत अधिकच रंगतदार होणार आहे. भाजपमधील नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारे संभाव्य स्वागत यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. बेलापूरच्या राजकीय रिंगणात पुढील दोन-तीन दिवसांत कोणती मोठी घडामोड होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com